गुळाला दर नसल्यामुळे गुऱ्हाळघरे अडचणीत
By Admin | Updated: November 27, 2014 00:18 IST2014-11-26T22:49:57+5:302014-11-27T00:18:56+5:30
गळितासाठी शेतकरी धजेनात : आरळा, कणदूरपर्यंत ४५ गुऱ्हाळ ठिय्ये

गुळाला दर नसल्यामुळे गुऱ्हाळघरे अडचणीत
पुनवत : शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यात आणि विशेषत: कणदूरमध्ये गुऱ्हाळघरे नुकतीच सुरू झाली आहेत. मात्र हंगामाच्या सुरूवातीलाच गुळाला चांगला दर नसल्याने, शेतकरी गुऱ्हाळातील गळिताकडे पाठ फिरवू लागले आहेत. ऊस दराचा निर्णय झाल्यानंतरच गुळाच्या दरात वृध्दी होईल, असे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.
शिराळा तालुक्यात साधारणत: दिवाळीनंतर गुऱ्हाळांचा गळीत हंगाम सुरू होतो. यावर्षी परवाच्या अवकाळी पावसामुळे गुऱ्हाळघरे उशिरा सुरू झाली आहेत. काही गुऱ्हाळघरे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. वारणा पट्ट्यात आरळ्यापासून ते कणदूरपर्यंत सुमारे ४० ते ४५ गुऱ्हाळ ठिय्ये आहेत. प्रतिवर्षी एकेका गुऱ्हाळघरात सुमारे २५ ते ३० लोकांना रोजगार मिळतो. गेल्यावर्षी कणदूर येथील शेतकऱ्यांच्या गुळाच्या कलमांना ५ हजार ते ६ हजार ८०० पर्यंत दर मिळाला. गुळमोदकांनाही गतवर्षी ८ हजारपर्यंत दर मिळाला आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या गुळदराच्या धोरणावर शेतकऱ्यांची नाराजी आहे.
व्यापाऱ्यांनी फक्त एखाद्या कलमाला वाढीव दर न देता सरासरी दर वाढवला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. उसाचा दर निश्चित नसल्याने गुळाचा दरही जेमतेमच आहे. शेतकरी गुळाच्या गळिताकडे सध्या तरी पाठ फिरवू लागले आहेत. (वार्ताहर)
आदनाचे गणित
एका आदनाला २ टन ऊस लागतो. या गळितातून ८ ते ९ रवे पडतात. एका आदनाचा गुऱ्हाळ खर्च १८०० रुपये असून, त्या गुळाला बाजारपेठेत २५०० ते ३००० पर्यंत दर मिळाला, तर शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही. शेतकऱ्यांनी गुळाची विक्री शेरणी रुपात केली, तर त्याला एका आदनापासून ४००० ते ४२०० रुपये मिळतात.