सुंदरी, हम बहोत शरमिंदा है!
By Admin | Updated: May 27, 2016 00:04 IST2016-05-26T23:23:10+5:302016-05-27T00:04:43+5:30
सांगलीत कँडल मार्च : पालिकेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सुंदरी, हम बहोत शरमिंदा है!
सांगली : सह्याद्रीनगर येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या सुंदरी भारती या सहा वर्षाच्या बालिकेला आदरांजली वाहण्यासाठी गुरुवारी सायंकाळी जिल्हा सुधार समितीच्यावतीने महापालिकेवर कँडल मार्च काढण्यात आला. ‘सुंदरी हम बहोत शरमिंदा है’, अशी घोषणाबाजी करीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांचा यावेळी धिक्कार केला.
गेल्या आठवड्यात सह्याद्रीनगर येथील रेल्वे रुळाजवळ सुंदरी या सहा वर्षाच्या बालिकेवर पंधरा ते वीस कुत्र्यांनी हल्ला केला होता. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तरीही महापालिका प्रशासनाने आजअखेर ठोस कृती केलेली नाही.
गुरुवारी जिल्हा सुधार समितीच्यावतीने सुंदरी भारती हिला आदरांजली वाहण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. मारुती चौकातून कँडल मार्चला सुरूवात झाली. यामध्ये सुधार समितीचे अमित शिंदे, शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार, माजी नगरसेविका ज्योती आदाटे, विद्या स्वामी, मनसेचे शहराध्यक्ष अमर पडळकर, गुंठेवारी चळवळ समितीचे अध्यक्ष चंदन चव्हाण, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. बालाजी चौक मार्गे हा मार्च महापालिकेवर आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आयुक्त अजिज कारचे, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. पृथ्वीराज पवार म्हणाले की, या बालिकेच्या मृत्यूला अधिकारीच कारणीभूत आहेत. महापालिकेला ३५० रुपयांत नसबंदीचा प्रस्ताव दिला होता. पण मलई खाण्यासाठी प्रशासनाने ८५० रुपयांना ठेका दिला. त्याचे पुरावे आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली असून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
अशरफ वांकर, धनंजय आरवाडे, शशिकांत गायकवाड, विकास मगदूम, जनार्दन गोंधळी, छाया जाधव आदी यात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
घरात कुत्री सोडू!
अमित शिंदे म्हणाले की, कुत्र्यांची नसबंदी करण्याऐवजी पैसे खाणाऱ्यांचीच नसबंदी केली पाहिजे. मलईसाठी अधिकारी नागरिकांच्या जिवाशी खेळ करीत आहेत. या अधिकाऱ्यांच्या जिवाशी आता सुधार समिती खेळ खेळल्याशिवाय राहणार नाही. कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही, तर आयुक्त व अधिकाऱ्यांच्या घरात कुत्री सोडू.
सांगलीत कुत्र्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या सुंदरी भारती या बालिकेला आदरांजली वाहण्यासाठी सुधार समितीच्यावतीने गुरुवारी कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी अमित शिंदे, पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, ज्योती आदाटे, विद्या स्वामी, विकास मगदूम आदी सहभागी झाले होते.