नीट वागा, अन्यथा ‘माजी नगरसेवक’ व्हाल!

By Admin | Updated: August 13, 2015 23:17 IST2015-08-13T23:17:05+5:302015-08-13T23:17:05+5:30

मदनभाऊंचा दम : काँग्रेसअंतर्गत वादावर नगरसेवकांच्या बैठकीत खरडपट्टी

Be nice, otherwise you'll be a 'former corporator'! | नीट वागा, अन्यथा ‘माजी नगरसेवक’ व्हाल!

नीट वागा, अन्यथा ‘माजी नगरसेवक’ व्हाल!

सांगली : महापालिकेतील काँग्रेसअंतर्गत वादावर सत्ताधारी गटाचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांनी नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली. पदाधिकारी, नगरसेवकांना डोस देताना ‘नीट वागा, अन्यथा ‘माजी नगरसेवक’ म्हणून पाटी लावायला तयार राहा’, असा दमही गद्दारी करण्याचे मनसुबे आखलेल्यांना भरला. केवळ आपलीच कामे प्रशासनाकडे न रेटता सर्वसामान्य नगरसेवकांची कामे करण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला. बुधवारी रात्री मदन पाटील यांच्या फार्म हाऊसवर नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला पाटीलसमर्थक ३० नगरसेवक उपस्थित होते, तर पतंगराव कदम गटाचे दहाजण गैरहजर होते. सध्या पालिकेतील काँग्रेसमध्ये पाटील-कदम गटात संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी समर्थकांची कानउघाडणी केली. कोणाची पावले वेडीवाकडे पडणार असतील, तर त्यांनी आतापासूनच माजी नगरसेवक व्हायला तयार व्हावे. यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पाटील यांनी सुनावले. काही नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बैठकीत तक्रारी केल्या. पदाधिकारी केवळ आपल्या प्रभागातील कामे प्रशासनाकडे रेटतात. प्रशासनही त्यांचेच ऐकते. त्यामुळे सामान्य नगरसेवकांना न्याय मिळत नाही, असा नगरसेवकांचा सूर होता. पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देताना त्यांनी पालिकेत पन्नास टक्के महिला नगरसेविका आहेत, त्यांची कामे होताना अडचणी येतात. या कामाचा पाठपुरावा पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून करावा. नव्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन पालिकेचा कारभार करण्याची सूचना केली. ‘मला पालिकेतील सत्तेची चिंता नाही. मी कोणाशीही तडजोड करू शकतो,’ असे सूचक वक्तव्य करीत मदनभाऊंनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी जुळलेला राजकीय संबंध उघड करीत एकप्रकारे कारभाऱ्यांना इशाराच दिला. राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेला निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी प्रस्ताव तयार करून मुंबईत पाठपुरावा करण्याची गरज आहे. सध्याचे पदाधिकारी सहा महिने खुर्चीवर बसून आहेत; पण एकदाही मंत्रालयात गेलेले नाहीत. भाजप सरकारमधील काही मंत्र्यांशी आपली चांगली ओळख आहे. त्याचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. त्यासाठी शासन, नगरविकास खात्याकडे प्रयत्न करावेत. खुर्चीला चिकटून बसू नका, असा सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)


पाणीपुरवठा खासगीकरणावर चर्चा
पाणीपुरवठा विभागातील वसुली व इतर कामे खासगी एजन्सीकडे देण्यावरही बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी या ठरावाला विरोध केला, तर ज्यांनी हा ठराव आणला आहे, त्यांनी त्याचे समर्थनही केले. त्यावर मदन पाटील यांनी गटनेते किशोर जामदार यांना, काय विषय आहे, असे विचारले. जामदार यांनी या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, येत्या दोन दिवसांत अभ्यास करून पार्टी मिटिंगमध्ये सर्व सदस्यांना त्याची कल्पना देऊ, त्यानंतरच सर्वसंमतीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.

जनाबांची उपस्थिती
मदन पाटील यांच्या बैठकीवर इद्रिस नायकवडी गटाने बहिष्कार टाकला होता; पण त्यांचे वडील इलियास नायकवडी मात्र फार्म हाऊसवर उपस्थित होते. त्यांनी मदनभाऊंशी खासगीत चर्चा केली आणि ते बैठकीतून निघून गेले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचाविल्या होत्या. नायकवडी गटाची नेमकी भूमिका काय? अशी चर्चा आज दिवसभर महापालिकेत सुरू होती.

गतवेळेसारखा बीओटीचा घोळ नको
बैठकीत बीओटीच्या संभाव्य प्रस्तावावरही चर्चा झाली. मदन पाटील यांनी मागील बीओटीसारखे प्रकार करू नका, अशा स्पष्ट सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेचे उत्पन्न घटले असून, नवे पर्याय शोधावे लागतील. त्यासाठी बीओटी हा एक पर्याय असू शकतो. पण गतवेळेसारखे भूखंड विकून बीओटी नको आहे. कायदेशीर आणि महापालिकेचा जास्तीत जास्त फायदा करून देणारे बीओटी प्रकल्प करण्यास हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.

Web Title: Be nice, otherwise you'll be a 'former corporator'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.