ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:23+5:302021-09-15T04:30:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : आधुनिक युगात आता प्रत्यक्ष जोडीदार पाहण्यापेक्षा मॅट्रोमोनिअल साईटवर ऑनलाईन जोडीदार शोधण्याकडे तरुण, तरुणी तसेच ...

ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आधुनिक युगात आता प्रत्यक्ष जोडीदार पाहण्यापेक्षा मॅट्रोमोनिअल साईटवर ऑनलाईन जोडीदार शोधण्याकडे तरुण, तरुणी तसेच अन्य वयोगटातील लोकांचा कल वाढला आहे. हा वाढता कल धोक्याची घंटाही वाजवत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगली नाही तर हात पिवळे न होताच खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी त्यांचा मोर्चा मॅट्रोमोनिअल साईटकडे म्हणजे वधू-वर सूचक मंडळांच्या ऑनलाईन संकेतस्थळांकडे वळविला आहे. त्यामुळे लग्न जुळविण्यासाठी उचलले जाणारे प्रत्येक पाऊल सावधगिरीचे हवे.
चौकट
...ही घ्या काळजी
कोणत्याही मॅट्रोमोनी वेबसाईट्सवर रजिस्ट्रेशन करण्याआधी त्या संकेतस्थळाविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या.
कोणत्याही वेबसाईटवर विश्वास ठेवण्याआधी मित्र आणि कुटुंबाचा सल्ला नक्की घ्या.
जोडीदाराशी ऑनलाईन चर्चा करताना सतर्कता बाळगावी
लग्नाआधी पसंत पडलेल्या ऑनलाईन जोडीदाराशी पैशाचे व्यवहार करु नयेत
चौकट
अशी होऊ शकते फसवणूक
ऑनलाईन मॅचमेकिंगवरुन संपर्कात आलेली व्यक्ती कर विभागाने त्यांचे गिफ्ट पकडल्याचा बहाणा करुन पैशाची मागणी करते. पैसे मिळाल्यानंतर अशा व्यक्ती अचानक गायब होतात.
आर्थिक संकट आल्याचे किंवा आजारपणाचे कारण सांगूनही पैशाची ऑनलाईन मागणी केली जाते. त्यातूनही फसवणुकीच्या घटना घडत आहेत.
कोट
जोडीदार ऑनलाईन निवडत असताना काळजी घ्यावी. लग्नापूर्वी कोणतेही ऑनलाईन व्यवहार करू नयेत. त्यातूनही फसवणूक झाली तर सायबर क्राईम सेलशी संपर्क साधावा.
- रोहिदास पवार, पोलीस उपनिरीक्षक, सायबर क्राइम सेल, सांगली