सावधान! बोगस विमा पॉलिसी सुरू आहे...

By Admin | Updated: December 26, 2014 23:48 IST2014-12-26T22:53:04+5:302014-12-26T23:48:32+5:30

एजंटांचा वाहन मालकांना गंडा : अपघातानंतर बोगसगिरीचा होतोय भांडाफोड

Be careful! Bogus insurance policy is underway ... | सावधान! बोगस विमा पॉलिसी सुरू आहे...

सावधान! बोगस विमा पॉलिसी सुरू आहे...

अशोक डोंबाळे - सांगली -बोगस गुणपत्रे-प्रमाणपत्रे देऊन हजारोंना पदवीधर करणाऱ्या ‘गावडे विद्यापीठा’चा ‘आदर्श’ घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील (आरटीओ) काही एजंटांनी वाहनांच्या बोगस विमा पॉलिसीच्या प्रमाणपत्रांची चलती सुरू केली आहे. वाहनांच्या वार्षिक तीस ते पस्तीस हजाराच्या विमा हप्त्याची नामांकित कंपनीची पॉलिसी केवळ तीन ते चार हजारात दिली जात आहे. पैसे वाचविण्यासाठी काही वाहनमालक जाणीवपूर्वक बोगस पॉलिसी घेत आहेत, तर काही वाहन मालकांची एजंटाकडून फसवणूक झाल्याचे अपघातानंतर उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे ही बोगसगिरी तपासण्याची कोणतीही व्यवस्था आरटीओ कार्यालयाकडे नाही.
नवे वाहन खरेदी करताना विमा उतरवणे अनिवार्य आहे. शिवाय जुन्या वाहनांची खरेदी-विक्री आणि वाहनांचा परवाना नूतनीकरण यासाठीही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विम्याची सक्ती केली आहे. त्यावर डोकेबाज एजंटांनी बोगस विम्याचा उपचार शोधून काढला आहे. विमा पॉलिसींची चलती लक्षात घेऊन एजंटांनी बोगसगिरी सुरू केली आहे. नामांकित विमा कंपनीच्या पॉलिसीची पावती घेऊन ती संगणकाद्वारे स्कॅन केली जाते. संगणकावरील तांत्रिक करामतींद्वारे फोटो शॉपीमध्ये मूळ विमा कंपनीच्या पॉलिसीचा क्रमांक आणि व्यक्तीचे नाव बदलून तेथे बोगस क्रमांक आणि वाहन खरेदीदाराचे नाव टाकले जात आहे. हा बदल करण्यासाठी केवळ पाच ते दहा रुपये खर्च येतो. ट्रक, ट्रॅक्टर अशा मोठ्या वाहनांची विमा पॉलिसी काढल्यानंतर त्याचा वर्षाचा हप्ता तीस ते पन्नास हजारापर्यंत येतो. मात्र एजंट तीन ते चार हजार रुपयांमध्ये नामांकित कंपनीच्या पॉलिसीची हुबेहूब पावती व प्रमाणपत्र देत आहेत.
विशेष म्हणजे काही वाहन मालकांच्या सहमतीनेच किरकोळ किमतीत विमा पॉलिसीची विक्री होत आहे. मात्र संबंधित वाहनाचा अपघात झाल्यानंतरच हा धक्कादायक प्रकार उजेडात येतो. काही एजंट तर सरसकट वाहनधारकांच्या माथी अशी बोगस पावती-प्रमाणपत्र मारत आहेत. आरटीओ कार्यालयात या प्रमाणपत्रातील खरे-खोटेपणा तपासण्याची व्यवस्था नसल्याने ही बोगसगिरी खपून जात आहे. काही घटनांमध्ये वाहनधारकाच्या सहमतीने बोगस विमा कंपनीच्या पॉलिसीची विक्री होत असल्याचे दिसत आहे, तर काही घटनांमध्ये वाहनधारकाला कल्पना न देताच एजंट थर्ड पार्टी विम्याच्या नावाखाली बोगस विमा देत असल्याचे स्पष्ट होत आहे.


अडचणीचा गैरफायदा
बँकांचे हप्ते, डिझेलचे वाढते दर आणि त्या तुलनेत व्यवसाय नसल्यामुळे ट्रकचा धंदा आतबट्ट्यात आला आहे. असे अडचणीतील ट्रकचालक आरटीओ आणि पोलिसांना दाखविण्यासाठी किरकोळ किमतीमधील बोगस विमा पॉलिसींचा वापर करीत आहेत. ट्रक चालकांना सांगली, कोल्हापूर, पुणे येथील एजंटांकडून मोठ्याप्रमाणात बोगस विमा पॉलिसींची विक्री झाल्याचे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.


असे आहेत बोगस दर
वाहनवार्षिक हप्ता बोगस दर (रु.)
ट्रक३०००० ते ३५०००४०००
ट्रॅक्टर ८००० ते ९०००४०००
कार७००० ते १३०००२०००
टेम्पो१८००० ते २००००३०००
दुचाकी ९०० ते १०००२००


सर्वाधिक बोगस विमा ट्रॅक्टरचा
साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर लावायचा असेल, तर विम्याची पावती जोडावी लागते. ट्रॅक्टरचा दोन टॉल्यांसह पूर्ण विमा उतरवायचा असेल, तर वार्षिक आठ ते नऊ हजार रुपये हप्ता आहे. एवढा हप्ता भरण्यापेक्षा दोन हजारात बोगस विमा घेतलेला बरा, म्हणून ट्रॅक्टर मालकच बोगस विमा घेत आहेत! ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालक बोगस विम्याच्या पावत्या ठेवत असल्याचे दिसत आहे. एजंटांकडून मोठ्याप्रमाणात बोगस विमा पॉलिसींची विक्री झाल्याचे जाणकारांचे मत आहे. याबद्दल नामांकित कंपन्यांचीही तक्रार आहे. परंतु, पोलिसांचा ससेमिरा नको, म्हणून त्याही उघड बोलण्यास तयार नाहीत.

Web Title: Be careful! Bogus insurance policy is underway ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.