प्रस्थापितांच्या प्रभागात प्रतिष्ठेची लढाई

By Admin | Updated: November 17, 2016 23:17 IST2016-11-17T23:17:06+5:302016-11-17T23:17:06+5:30

तासगाव पालिका निवडणुकीत कुरघोड्या : उट्टे काढण्यास विरोधक सरसावले; प्रचारात चढाओढ

The battle of the prestige in the division of the establishment | प्रस्थापितांच्या प्रभागात प्रतिष्ठेची लढाई

प्रस्थापितांच्या प्रभागात प्रतिष्ठेची लढाई

दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव नगरपालिकेच्या दहा प्रभागातील निवडणुकीचा फड सध्या चांगलाच रंगात आला आहे. २१ जागांवर निवडणूक होत असली तरी, प्रस्थापित उमेदवारांच्या लढतीकडे अवघ्या तासगावकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे. पारंपरिक विरोधकांत होत असलेली लढत, पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण, जातीय समीकरण आणि प्रस्थापित नगरसेवकांच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. या निवडणुकीत जुने उट्टे काढण्यासाठी प्रतिस्पर्धी सरसावले असून, प्रचारात चांगलीच चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
तासगाव नगरपालिका निवडणुकीत दहा प्रभागांतून २१ जागांसाठी लढत होत आहे. काही प्रभागांत तिरंगी, तर काही प्रभागांत बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी प्रचाराच्या यंत्रणेने रंग भरला आहे. मात्र काही प्रभाग जुन्या-नव्या समीकरणांमुळे विशेष लक्षवेधी ठरत आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपमधील प्रस्थापित माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील आणखी एकदा नशीब अजमावत आहेत. या ठिकाणी त्यांच्याविरोधात सातत्याने लढत देणारे राष्ट्रवादीचे अभिजित माळी पुन्हा एकदा विरोधात उभे ठाकले आहेत. बाबासाहेब पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच भाजपांतर्गत गटबाजीतून कुरघोडी करण्यासाठीदेखील एका गटाने या ठिकाणी लक्ष केंद्रित केल्याची चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले अरुण साळुंखे भाजपकडून रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपचे प्रस्थापित पदाधिकारी माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांचा पत्ता कट करुन, या ठिकाणी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या जाफर मुजावर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी सोडल्यामुळे आबाप्रेंमींनी चांगलीच मोट बांधली आहे, तर अविनाश पाटील यांच्या नाराजीची चर्चा जोर धरत आहेत. मुजावर पालिकेच्या राजकारणातील प्रस्थापित असल्याने हा प्रभागही लक्षवेधी ठरत आहे.
प्रभाग क्रमांक नऊमध्ये काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी उज्ज्वला पवार, तर त्यांचे पारंपरिक विरोधक भाजपचे दिग्विजय पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या ठिकाणची लढतही उत्सुकतेचा विषय ठरत आहे. तसेच प्रभाग दहामध्ये माजी नगरसेविका अनुराधा पाटील यांचे दीर सचिन पाटील राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत.
हा प्रभाग शहरातील सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागात तीन उमेदवार आहेत. त्यामुळे या प्रभागांच्या लढतीकडे अवघ्या तासगावकरांचे लक्ष लागून राहिले असून, या प्रभागांतून सुरु असलेली प्रचार यंत्रणा एकमेकांवर कुरघोडी करत चढाओढीने कार्यरत असल्याचे चित्र आहे. या प्रभागांतील लढती सर्वच उमेदवारांसाठी अस्तित्वाच्या ठरल्या आहेत.
राजेंद्र म्हेत्रे यांचा पत्ता केला कट
प्रभाग चारमध्ये भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र म्हेत्रे यांचा पत्ता कट करुन राजकारणात नवख्या असणाऱ्या किशोर गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागाबाबतही कुतूहल निर्माण झाले आहे. प्रभाग पाचमध्ये भाजपचे प्रस्थापित उमेदवार तत्कालीन उपनगराध्यक्ष अनिल कुत्ते रिंगणात आहेत.

Web Title: The battle of the prestige in the division of the establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.