लाच घेताना हवालदारास अटक

By Admin | Updated: June 3, 2014 23:56 IST2014-06-03T23:55:31+5:302014-06-03T23:56:27+5:30

शिराळा तहसील कार्यालयासमोर कारवाई

The batchman was arrested while taking a bribe | लाच घेताना हवालदारास अटक

लाच घेताना हवालदारास अटक

शिराळा : तुझ्याविरुद्ध तक्रार अर्ज आला आहे. कारवाई करायची नसेल तर पन्नास हजाराची लाच द्यावी लागेल, असे सांगून लाच घेताना शिराळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार एकनाथ आवडाजी पारधी (वय ३६, रा. शिराळा, मूळ गाव कोतुल, ता. अकोळ, जि. अहमदनगर) यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आज, मंगळवार दुपारी पथकाने तहसील कार्यालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा) येथील जमिनीच्या वादातून एकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. हे प्रकरण पारधी याच्याकडे सोपविण्यात आले होते. पारधीने अर्जातील संशयितास बोलावून घेऊन तुझ्याविरुद्ध तक्रार आली आहे. तुझ्यावर कारवाई करायची नसेल, तर पन्नास हजाराची लाच द्यावी लागेल, अशी मागणी केली. त्यानंतर संशयिताने दि. २९ मेला सांगली लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या विभागाने लावलेल्या सापळ्यानुसार लाचेची रक्कम देण्याचे आज ठरले होते. दुपारी सव्वादोन वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात पथकाने सापळा लावला. पारधी यास तहसील कार्यालयाच्या बाहेर असणार्‍या झेरॉक्स दुकानाबाहेर संशयिताकडून पन्नास हजाराची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे, निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, चंद्रकांत गायकवाड, लक्ष्मण मोरे, जितेंद्र काळे, सचिन कुंभार, सुनील कदम, सुनील राऊत, दीपक धुमाळे, अश्विनी कुकडे, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली. हवालदार पारधी याला तक्रारदाराच्या तक्रारीवरून याआधी तीनवेळा लाचलुचपत विभागाने पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या प्रयत्नात अपयश आले. आज मात्र पारधीला रंगेहात पकडले. याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे. या पथकाने हवालदार पारधी राहात असलेल्या शिराळा येथील निकम गल्लीतील घराची झडती घेतली आहे. (वार्ताहर)

Web Title: The batchman was arrested while taking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.