बस्तवडे स्फोटातील जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:47+5:302020-12-08T04:24:47+5:30

दरम्यान, सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी बस्तवडे येथील स्फाेट झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ...

Bastawade blast kills two, death toll rises to two | बस्तवडे स्फोटातील जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या दोन

बस्तवडे स्फोटातील जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या दोन

दरम्यान, सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी बस्तवडे येथील स्फाेट झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सांगली जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम, तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे उपस्थित होते.

तालुक्यातील बस्तवडे येथे गट नंबर ३७७ मध्ये पटवर्धन परिसरात डोंगर आहे. यातील डोंगराचा काही भूभाग सिद्धेवाडी येथील एकाने विकत घेतला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून येथील डोंगरावर जमीन सपाटीकरणाकरिता ब्लास्टिंगचे काम सुरू आहे. या कामासाठी महाराष्ट्रासह बिहार व झारखंड या राज्यातील ४० हून अधिक कामगार काम करत आहेत. बोअर ब्लास्टिंगच्या साहाय्याने डोंगरात वीस फुटी पहार ठाेकून जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट करून उत्खनन केले जात होते. यानंतर पुन्हा पाच फुटी पहारीद्वारे स्फाेट करण्यात येत होता. शनिवारी रात्रीपासून पहारा ठाेकण्याचे काम सुरू होते. ते रविवारी दुपारी तीनपर्यंत चालू होते. दुपारी साडेतीनच्या दरम्यान तापलेल्या ड्रीलिंगच्या गाडीतला कॉम्प्रेसर गरम होऊन एका सिलिंडरसह डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात जिलेटिनच्या कांड्यांचाही स्फोट झाला. स्फोटामुळे दोन्ही ड्रीलिंगचे ट्रक पेटले. घटनास्थळी आग व धुराचे लोट सुरू झाले. यात दोन्ही ट्रक जळून खाक झाले. दोन्ही ट्रकमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. स्फोटाची तीव्रता व आवाज इतका होता, की दहा किलोमीटरवरील घरांना धक्के जाणवले होते.

दरम्यान, या स्फोटामुळे आजुबाजूच्या शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. कूपनलिकेचे पाणी जाण्याचे प्रकारही समाेर येत आहेत. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

फाेटाे : ०७ तासगाव १

ओळ :

बस्तवडे (ता. तासगाव) येथे स्फोट झालेल्या घटनास्थळाला विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी सोमवारी दुपारी भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Bastawade blast kills two, death toll rises to two