वारणा काठावर महापुरातील ऊस झाला जनावरांचा चारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:18+5:302021-09-16T04:32:18+5:30
कुरळप : जुलै महिन्यात वारणा नदीला आलेल्या महापुराने सर्वात जास्त ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. या उसाचा सध्या ...

वारणा काठावर महापुरातील ऊस झाला जनावरांचा चारा
कुरळप : जुलै महिन्यात वारणा नदीला आलेल्या महापुराने सर्वात जास्त ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. या उसाचा सध्या जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत झाले आहे. यामुळे वाळवा तालुक्यातील वारणा काठावरील शेतकरी सध्या चिंतेत दिसून येत आहे.
२०१९ व २०२१ अशी दोन वर्षे वारणा नदीला आलेल्या महापुराने या परिसरातील ऊस शेती उद्ध्वस्त झाली आहे. ऊस शेतीवर या परिसरातील आर्थिक गणित अवलंबून आहे. त्यामुळे ऊस शेतीला उत्पादकांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. हेच उसाचे गणित कोलमडून पडल्याने शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. दोनवेळच्या महापुराने येथील ऊस शेती पूर्णत: तोट्यात सुरू असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
ऐतवडे खुर्द येथे महापुराने जवळपास ६५० हेक्टर ऊस शेती पूरबाधित झाली आहे. अनेक ऊस उत्पादक पुरात बुडालेला ऊस जनावरांना चारा म्हणून घालत आहेत. उसाची लागण करताना बी-बियाणे, औषधे, महागडी खते, शेतीची मशागत, आदी खर्च काढला, तर एकरी ५० हजार रुपये खर्च येतो. महापुरात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या डोळ्यात आता अश्रू तरळत आहेत.
शासनाने जाहीर केलेली नुकसानग्रस्त पंचनाम्याची मदतही तोकडीच आहे. महापुरातून बचावलेल्या उसाला साखर कारखान्यांकडून मिळणारा अवाजवी दर व खर्चाचा हिशेब केला, तर ऊसशेती पूर्णतः तोट्यात असल्याचे चित्र दिसत आहे.