बँका, एटीएमसमोरील रांगा हटेनात
By Admin | Updated: November 15, 2016 23:37 IST2016-11-15T23:37:31+5:302016-11-15T23:37:31+5:30
सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी : पन्नास टक्के एटीएम बंद; पैसे मिळविण्यासाठी नागरिकांचे हाल

बँका, एटीएमसमोरील रांगा हटेनात
सांगली : जिल्ह्यातील बँका सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी सकाळी दहा वाजता उघडताच बँकांसमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या. एटीएम केंद्रांवर तर सकाळी आठपासून गर्दी होती. दिवसभरात बँका व एटीएमसमोरील गर्दी हटलेली नव्हती. त्यात शहरातील पन्नास टक्क्याहून अधिक एटीएम बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आणि बदलण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल झाले.
पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंदचा परिणाम आठवडाभरापासून दिसू लागला आहे. सर्वसामान्य नागरिक नोटा बदलण्यासाठी बँकेच्या दारात तासन् तास ताटकळत आहे. तसेच पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर गर्दी होत आहे. त्याचा प्रत्यय मंगळवारीही आला. सोमवारी बँका व एटीएम बंद होती. मंगळवारी बँका उघडताच नागरिकांनी पुन्हा रांगा लावल्या होत्या. काही एटीएममध्ये सकाळीच पैशाचा भरणा करण्यात आला होता. त्यामुळे अशा एटीएमबाहेर सकाळी आठ वाजता भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरून जाणारे लोकही एटीएम सुरू दिसताच रांगेत उभे राहत होते.
शहरातील स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय अशा मोठ्या बँकांसमोर दिवसभर रांगा लागल्या होत्या. स्टेट बँकेच्या गणपती मंदिरजवळील शाखेने नागरिकांच्या सोयीसाठी बाहेर मंडपही घातला आहे. स्टेशन चौकातील पोस्ट कार्यालयात सर्वात मोठी रांग होती. पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते फूटपाथपर्यंत रांग लागली होती. त्यामुळे राजवाडा चौक ते स्टेशन चौक या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती. अनेक बँकांसमोर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. एकूणच नोटा बंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम जाणवत होता. (प्रतिनिधी)
मिरजेत रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ
पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे मिरजेतील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची पंचाईत झाली आहे. दि. २४ पर्यंत खासगी रुग्णालये, औषध दुकानांना जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश आहेत. मात्र वैद्यकीय तपासण्यांसाठी हजार, पाचशेच्या जुन्या नोटा घेण्यात येत नसल्याने नोटा बदलून घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.
मिरजेत नामांकित वैद्यकतज्ज्ञांची खासगी रुग्णालये, तसेच मोठी रुग्णालये असल्याने परजिल्ह्यांसह कर्नाटकातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात. आठवड्यापूर्वी अचानक हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, येथील खासगी रुग्णालयांत खर्चिक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना उपचार खर्चासाठी नवीन नोटा मिळविण्याची समस्या आहे.
शासकीय व खासगी रुग्णालयांसह औषध दुकानदारांना जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आल्याने रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्व खासगी रुग्णालयांत जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी जुन्या नोटांऐवजी धनादेश मागण्यात येत आहे. रुग्णालये व औषध दुकानदार जुन्या नोटा स्वीकारत असले तरी, वैद्यकीय तपासण्यांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांना क्ष-किरण, सीटी स्कॅन, सोनोग्राफी यांसह रक्तासह इतर वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. परगावातून मिरजेत आलेल्या रुग्णांना दैनंदिन खर्चासाठीही नव्या नोटा आवश्यक असल्याने त्यांची पंचाईत होत आहे. आर्थिक टंचाईमुळे शक्य असलेल्या रुग्णांनी उपचार घेणे पुढे ढकलले आहे किंवा काही रुग्ण घरी परत गेले आहेत. नोटांवरील बंदीमुळे मिरजेतील रुग्णालयांत रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)