जिल्हा बँकेचे व्यवहार दुसऱ्या दिवशीही ठप्प
By Admin | Updated: November 11, 2016 00:07 IST2016-11-10T23:52:03+5:302016-11-11T00:07:56+5:30
राज्य बँकेच्या आदेशाने गोंधळ : अनेक शाखांमध्ये वादावादीच्या घटना, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली

जिल्हा बँकेचे व्यवहार दुसऱ्या दिवशीही ठप्प
सांगली : ग्रामीण भागात छोट्या गावांपर्यंत शाखांचे जाळे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी नाकारल्याची माहिती राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी दिली. यासंदर्भातील माहितीचा मेल सर्व बँकांना प्राप्त झाल्यानंतर गोंधळ उडाला. सांगली जिल्ह्यात दुपारनंतर बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली असून अनेक शाखांमध्ये वादावादीच्या घटना घडल्या.
जिल्हा बँकेने सकाळी नेहमीप्रमाणे सर्व शाखांचे व्यवहार सुरू केले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यापासून त्या स्वीकारण्याची यंत्रणाही उभारण्यात आली. जिल्ह्यातील २१७ शाखांमध्ये नोटा जमा करण्यासाठी व बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. अनेकांनी बँकेतून नियमाप्रमाणे पैसे बदलून घेतलेही. दुपारी २ वाजेपर्यंत हा व्यवहार सुरळीत सुरू असताना, राज्य सहकारी बँकेकडून जिल्हा बँकेस मेल प्राप्त झाला. बँकेचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक बी. एम. रामदुर्ग आणि व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी याबाबतची कल्पना जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना दिली. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या करन्सी (चलन) विभागाशी संपर्क साधण्यात आला असता, या विभागातील अधिकाऱ्यांनीही, जिल्हा बँकेला अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.
बँकेने दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील सर्व २१७ शाखांमध्ये जुन्या नोटा स्वीकारणे व जमा करण्याची प्रक्रिया बंद केली. कर्जाचा हप्ता जमा करण्यास आलेल्या कर्जदारांकडूनही पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक शाखांमध्ये बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांशी ग्राहकांनी वाद घातला. (प्रतिनिधी)
आदेशातील चूक
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारण्याबाबत जो आदेश काढला आहे, त्यामध्ये जिल्हा बँकांचा उल्लेख राहिला आहे. राज्याच्या अर्थखात्याच्या सचिवांनी याबाबतची माहिती दिली. लवकरच याबाबतचे आदेश दिले जाऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल.
९० कोटींची उलाढाल ठप्प
गुरुवारी दुपारपर्यंतच बॅँकेचे व्यवहार सुरू होते. दुपारनंतर शाखांचे कामकाज बंद केल्यामुळे दिवसभरात बॅँकेची ९० कोटींची उलाढाल ठप्प झाली. पैसे जमा करणे, कर्जाचे हप्ते स्वीकारणे, कर्जवाटप करणे, खात्यावरील पैसे देणे असे सर्वप्रकारचे व्यवहार पूर्णपणे बंद राहिले होते. रिझर्व्ह बॅँकेकडून रात्री उशिरापर्यंत कोणतेही आदेश मिळाले नसल्याने शुक्रवारच्या व्यवहाराबाबतही संदिग्धता आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे व्यवस्थापक मानसिंग पाटील यांच्याशी रात्री आठ वाजता संपर्क साधला असता, त्यांनी रिझर्व्ह बॅँकेकडून कोणतेही नवे आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. आदेशात बदल होणार असल्याची चर्चा असली तरी, त्याबाबतच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा बॅँकेला आहे. नवे आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले.