बँक ग्राहकांना लुटणारी तिघांची टोळी जेरबंद
By Admin | Updated: April 19, 2015 00:42 IST2015-04-19T00:42:56+5:302015-04-19T00:42:56+5:30
संशयित ओरिसातील : नऊ गुन्हे उघडकीस; तासगाव पोलिसांची कामगिरी; आणखी गुन्हे उघडकीस येणार

बँक ग्राहकांना लुटणारी तिघांची टोळी जेरबंद
सांगली : बँकेतून रोकड काढून बाहेर पडलेल्या ग्राहकांना लुटणाऱ्या तिघांच्या टोळीस पकडण्यात तासगाव पोलिसांना यश आले आहे. ही टोळी ओरिसातील आहे. यामध्ये एका बारा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून तासगाव, विटा व आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. टोळीने वर्षभरापासून धुमाकूळ घातला होता. त्यांना पकडण्यात यश आल्याने गुन्ह्यांना आळा बसला असल्याचे सावंत यांनी सांगितले.
अटक केलेल्यांमध्ये नाना शिवा नागलोरू (वय ३०) व कालिशंकर आहूल (१९, दोघे रा. कुदला, ता. कुदला जि. गजान, राज्य ओरिसा, सध्या चितळी, ता. खटाव, जि. सातारा) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअनिरीक्षक महंमद शेख यांचे पथक दोघांना घेऊन शनिवारी सायंकाळी तपासासाठी ओरिसाला रवाना झाले आहे. यातील बारा वर्षाचा संशयितही त्यांच्याच गावचा आहे. त्याची न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी संशयितांची कसून चौकशी केली. सध्या त्यांच्याकडून २ लाख ४० हजारांची रोकड जप्त केली आहे. त्यांनी लुटलेली रक्कम घरी ठेवली असल्याने ती जप्त करण्यासाठी पथक ओरिसाला रवाना केले आहे. संशयितांना काळजीपूर्वक नेण्याची सूचना सावंत यांनी पथकास केली.
संशयित नागलोरू याचा कुदलामध्ये हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय होता. त्याच्याकडे चितळी (ता. खटाव) येथील शिवाजी मल्हार जाधव कामाला होता. दीड वर्षापूर्वी नागलोरूने दारूचा व्यवसाय बंद केला. कालिशंकर व अल्पवयीन मुलास मदतीला घेऊन त्याने बँक ग्राहकांना लुटण्याचा उद्योग सुरू केला. तिघेही रेल्वेने साताऱ्याला यायचे. चितळीच्या शिवाजी जाधव याची दुचाकी घेऊन ते आटपाडी, तासगाव व विट्यात येत. अल्पवयीन मुलगा व काशिशंकर बँकेत जात. बँकेबाहेर नागलोरूदुचाकी घेऊन उभा असे. कोणत्या ग्राहकाने किती पैसे काढले आहेत, यावर दोघे लक्ष ठेवून असत. एखाद्याने जादा पैसे काढल्याचे निदर्शनास येताच ते नागलोरूला मोबाईलवर संपर्क साधून सांगत. नागलोरु ग्राहकाच्या अंगावर घाण टाकणे, हिसडा मारणे किंवा मोटारीची काच फोडणे, यापैकी कोणती संधी मिळेल त्यानुसार त्याचा वापर करून रक्कम लुटत असे. त्यानंतर तो भरधाव वेगाने निघून जात असे.
पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांचे पथक १६ एप्रिलला तासगावमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी वंदेमातरम् चौकात हे तिघेही संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तासगावमध्ये यापूर्वी घडलेल्या एका गुन्ह्यात संशयित सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्याचे फुटेज तपासल्यानंतर हे संशयित तेच असल्याचे निष्पन्न झाले. (प्रतिनिधी)