खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:27 IST2021-03-16T04:27:25+5:302021-03-16T04:27:25+5:30
केंद्र शासनाच्या बँक खासगीकरणाच्या धोरणाविरोधात युनायटेड फाेरम ऑफ बँक युनियनच्यावतीने सोमवारी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर निदर्शने करण्यात आली. लोकमत ...

खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
केंद्र शासनाच्या बँक खासगीकरणाच्या धोरणाविरोधात युनायटेड फाेरम ऑफ बँक युनियनच्यावतीने सोमवारी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्र सरकारने घेतलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरण धोरणाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी सोमवारपासून दोन दिवस संपावर गेले आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून बँक कर्मचाऱ्यांनी सांगलीत निदर्शने केली.
सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील काॅर्पोरेशन बँकेसमोर कर्मचाऱ्यांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आंदाेलनात अमोल खोत, संजय जोशी, मंदार परांजपे, सुधीर मांजरे आदी सहभागी झाले होते.
सांगली जिल्हा बँक कर्मचारी समन्वय समितीचे (युएफबीयू) अध्यक्ष लक्ष्मीकांत वसंतराव कट्टी यांनी सोमवारी संघटनेच्यावतीने केंद्र शासनाच्या धोरणास विरोध करण्यासाठी निवेदन प्रसिद्धीस दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी ८ मार्च रोजी समितीची बैठक झाली. सोमवारी आम्हाला सांगली शहरात आंदोलन करायचे होते. विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा, सूरक्षित अंतर ठेवून विरोधी फलक दर्शविण्यासाठी आम्ही मागणी केली, मात्र परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आंदोलन करता आले नाही. तरीही शासनाच्या या धोरणाचा आम्ही विरोध करीत आहोत.
सांगली जिल्ह्यात सार्वजनिक बँकांच्या १५८ व ग्रामीण बँकेच्या ४ अशा एकूण १६२ शाखा आहेत. त्यातील १ हजार ९०० कर्मचारी संपावर आहेत. शनिवार व रविवार धरून चार दिवस बँकांचे काम ठप्प राहणार आहे. त्यामुळे अंदाजे ४ हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. निदर्शने करण्यास परवानगी मिळाली नसल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी घरीच राहून किंवा ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून भूमिका सांगण्याचे आवाहन कट्टी यांनी केले आहे.
समितीची सोमवारी सांगलीत बैठकही पार पडली. या बैठकीस लक्ष्मीकांत कट्टी, अनंत बिळगी, दिलीप पाटील, अमोल खोत, संजय जोशी, अरविंद चौगुले, प्रवीण साने, उमेश खोत आदी उपस्थित होते.