मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी बहरले बंचाप्पा बन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:50+5:302021-06-09T04:34:50+5:30
भिलवडी : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे पलूस तालुक्यातील आमणापूर-बुर्लीदरम्यान असणारे बंचाप्पा बन बहरले आहे. कृष्णाकाठी निसर्ग हिरवाईची मुक्तहस्ताने जणू उधळण ...

मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी बहरले बंचाप्पा बन
भिलवडी : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे पलूस तालुक्यातील आमणापूर-बुर्लीदरम्यान असणारे बंचाप्पा बन बहरले आहे. कृष्णाकाठी निसर्ग हिरवाईची मुक्तहस्ताने जणू उधळण करत असल्याचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे.
कृष्णा नदीच्या काठावर शंभर एकर परिसरात गावठाण पसरले आहे. भाविकांचे श्रद्धास्थान बंचाप्पा देवाचे पुरातन मंदिर ते आमणापूर अशी दोन मैलांची तांबड्या मातीतील घोटलेली गाडीवाट आहे. त्याला झाडाच्या फांद्यांप्रमाणे फुटलेल्या असंख्य पायवाटा आहेत. पूर्वेला ऊसाची हिरवीगार शेती, पश्चिमेला संथ वाहणारी कृष्णामाई आहे. गुराखी, देवाच्या दर्शनाला येणारे भाविक, या वाटेने जाणारे शेतकरी व निसर्गाचा आस्वाद घेणारे लोक सोडले तर कुणाचीच वर्दळ नाही. मोठ्या प्रमाणात बाभूळ, देवबाभूळ आणि करंजीची हात पसरून उंच उभी असलेली झाडे, गवत आणि तरवड पावसामुळे सध्या हिरवेगार दिसत आहे. झाडाझुुडपांची मोठी संख्या असल्याने ढगाळ वातावरणात पिसारा फुलवून नाचणारे मोर, लांडोर यांचे दिवसभर दर्शन होते.
येथे पक्ष्यांची संख्या मोठी असून, यामध्ये मोर, पोपट, मनोली, सुगरण, चिमणी, नाचण, बुलबुल, कावळा, खंड्या, शेराटी, पारवा, बगळे, घार प्रामुख्याने पाहायला मिळतात. या बनामध्ये मालकोवा, सोनपाठी सुतार, मराठा सुतार, चातक, स्वर्गीय नर्तक, मोहोळ घार, तांबट, रक्तलोचन घुबड, रातवा अशा देशी-विदेशी दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. राखी-धनेशच्या जोडीचा वावर बंचाप्पा बन पक्ष्यांसाठी समृद्ध अधिवास असल्याची साक्ष देत आहे.
चौकट -
बंचाप्पा बनात पक्ष्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व अन्नाची सोय करावी लागेल, असे पक्षीमित्र संदीप नाझरे यांनी सांगितले.
फोटो : हात उंचावून आकाशाला गवसणी घालणाऱ्या बाभळी... हिरव्यागार गवतामधील तांबडी वाट... बंचाप्पा बनाचे हे मनमोहक दृश्य. (छाया - संदीप नाझरे)