सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवावी
By Admin | Updated: December 21, 2015 00:51 IST2015-12-20T23:01:38+5:302015-12-21T00:51:56+5:30
अजित सूर्यवंशी : पुन्हा राज्यभरात आंदोलन उभारणार; पान दुकानदारांचा मेळावा

सुगंधित तंबाखूवरील बंदी उठवावी
सांगली : सुगंधित तंबाखू विक्री करण्यावर राज्य शासनाने घातलेली बंदी तातडीने उठवावी, अन्यथा राज्यभर पुन्हा आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिला. रविवारी पटेल चौकातील साने गुरुजी उद्यानमध्ये महापालिका क्षेत्रातील पान दुकानदारांच्या आयोजित केलेल्या मेळाव्यात सूर्यवंशी बोलत होते.
ते म्हणाले, १८ जुलै २०१३ पासून शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पान व्यवसाय अडचणीत आला आहे. पान दुकानदारांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा शासनाचा हा डाव आहे. राज्यातील ५० लाख पान दुकानदार व फेरीवाले यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाला सुगंधित तंबाखूवर बंदी आणायची असेल, तर जिथे या तंबाखूचे उत्पादन होते, तिथे बंदी आणावी. कायद्याचा आधार घेऊन अन्न, औषध प्रशासन व पोलीस विनाकारण पान दुकानदार व फेरीवाल्यांना त्रास देत असतील, तर आम्ही सहन करणार नाही. पोलिसांनी प्रथम जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत, त्यानंतर सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करावी.
जिल्हा पान असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे म्हणाले, शासनाच्या गुटखा बंदीला पान दुकानदारांनी पाठिंबा दिला. पण आता सुगंधित तंबाखूवर घालण्यात आलेली बंदी ही अन्यायकारक आहे. शासन बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण पान व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. देशात आणि राज्यात दारु व सिगारेटमुळे लाखो लोकांचा बळी जात आहे. पण त्यावर बंदी घालण्यासाठी शासन पुढाकार घेत नाही. सुगंधित तंबाखूवर बंदी घालून, राज्यातील लाखो पान दुकानदार व फेरीवाल्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरु आहे.
जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, शहर अध्यक्ष मयूर बांगर यांनीही मनोगत व्यक्त केले. खजिनदार राजू पागे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी महापालिका क्षेत्र अध्यक्ष युसूफ जमादार, कार्याध्यक्ष बाबू कारंडे, जिल्हा सचिव मकरंद जमदाडे, राजू खोत, प्रकाश मोरे, रफीक मुजावर, अफजल चाऊस, रावसाहेब सरगर, राजू फोंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविणार
सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात प्रथम उपोषण, धरणे आंदोलन, घंटानाद, बोंबाबोंब, भीक मांगो व मोर्चा अशी टप्प्या-टप्प्याने आंदोलने केली जातील. यातूनही शासनाने तंबाखूवरील बंदी उठवली नाही, तर राज्य पातळीवर व्यापक आंदोलन उभे केले जाईल.