इस्लामपुरात प्रवेशबंदी फक्त फलकावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST2021-05-08T04:27:12+5:302021-05-08T04:27:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कडक लॉकडाऊनमुळे इस्लामपूर नगरपालिकेने शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्स लावून त्यावर प्रवेशबंदीचे फलक लावले ...

इस्लामपुरात प्रवेशबंदी फक्त फलकावरच
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कडक लॉकडाऊनमुळे इस्लामपूर नगरपालिकेने शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर बॅरिकेट्स लावून त्यावर प्रवेशबंदीचे फलक लावले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शहरात येणारे दुचाकीस्वार विविध कारणे देऊन पोलिसांना चकवा देत आहेत.
सांगली व वाळव्याकडून येणाऱ्या नागरिकांनी शहरात प्रवेश करू नये म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. तेथे पालिकेने प्रवेशबंदीचा फलक लावला होता. आता तो फलकही नाही. नोकरी, औषध खरेदी, रुग्णालये आदी कारणे सांगून नागरिक इस्लामपुरात येतच आहेत. कामेरीकडून आझाद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेशबंदीचा फलक लावला आहे. या चौकात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कामेरी रस्त्यावरील दत्त टेकडी परिसरात घरे, रुग्णालये आहेत. त्यामुळे तेथे फक्त बॅरिकेट्स लावले आहेत. त्यावर प्रवेशबंदीचा फलक लावला असला तरी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरूच आहे.
वाघवाडी येथून येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले असून त्यावर लावलेला प्रवेशबंदीचा फलक तुटलेल्या अवस्थेत आहे. कुरळप, वाघवाडी, वशी येथून उपचाराचे आणि औषध घेण्याचे कारण सांगून बहुतांशी दुचाकीस्वार शहरात प्रवेश करत आहेत. पोलिसांचा वचक नसल्याने रस्त्यावर वर्दळ दिसत आहे. अशीच अवस्था ताकारी-बोरगाव, बहे, साखराळे येथून येणाऱ्या रस्त्यांवरही आहे. या दुचाकीस्वारांना पोलिसांनी हटकले असता, विविध कारणे देऊन चकवा देण्याचा प्रयत्न ते करतात.