वसगडे-भिलवडी रस्त्यालगत बहरला सोनमोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:50+5:302021-04-01T04:27:50+5:30
ओळ : भिलवडी-माळवाडी रस्त्यालगतचा सोनमोहर पिवळ्याधमक फुलांनी बहरला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : वसगडे-भिलवडी रस्त्यालगत बहरलेला सोनमोहोर ...

वसगडे-भिलवडी रस्त्यालगत बहरला सोनमोहोर
ओळ : भिलवडी-माळवाडी रस्त्यालगतचा सोनमोहर पिवळ्याधमक फुलांनी बहरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : वसगडे-भिलवडी रस्त्यालगत बहरलेला सोनमोहोर येणा-जाणाऱ्यांना आकर्षित करून घेत आहे. शिशिर ऋतूत निसर्ग पानाफुलांच्या माध्यमातून जणू काही रंगांचा उत्सव खेळत असल्याची चाहूल लागत आहे.
शिशिराच्या प्रारंभापासून अनेक झाडांची पाने पिकून पिवळी पडल्याचे पाहायला मिळतात. आंब्याला मोहर येऊन फळात रूपांतर होते, तर काटेसावर, पळस या झाडांची पूर्ण पानगळ होऊन त्याला फुले लगडतात. लालचुटूक फुलांनी बहरलेला काटेसावर आणि केशरी फुलांनी लगडलेल्या पळसानंतर गुलमोहर, सोनमोहर (पितमोहर) या विदेशी झाडांच्या रंगोत्सवही लक्षवेधी ठरताे. वसगडे-भिलवडी रोडवर असलेला पितमोहोर सध्या पिवळ्या धमक सोनेरी फुलांच्या अलंकारांनी मढला आहे. हे मढवलेले फुलांचे दागिने मिरविण्याचे काम मे महिन्यापर्यंत चालणार असल्याची माहिती निसर्गप्रेमी संदीप नाझरे (आमणापूर) यांनी दिली. उन्हाने जिवाची काहिली झालेल्या वाटसरूच्या डोळ्यांना सुखावणारा हा पितमोहोर बघताच क्षणी नजरेत भरणारा आहे.