‘बॅगलिफ्टिंग’चे खापर विश्रामबागच्या ‘डीबी’वर!
By Admin | Updated: May 27, 2015 01:01 IST2015-05-26T23:08:40+5:302015-05-27T01:01:03+5:30
बरखास्तीचा दणका : पोलीस दलात खळबळ

‘बॅगलिफ्टिंग’चे खापर विश्रामबागच्या ‘डीबी’वर!
सचिन लाड - सांगली -गेल्या वर्षभरात शहरात बँकेतून रोकड काढून बाहेर पडलेल्या ग्राहकांना लुटणाऱ्या (बॅगलिफ्टिंग) गुन्ह्यांचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना अपयश आल्याचा ठपका ठेवत गुन्हे प्रगटीकरण शाखा (डीबी) सोमवारी रात्री बरखास्त केली. सांगली व मिरजेतील पोलीस ठाण्यांतील डीबीपेक्षा विश्रामबागच्या ‘डीबी’ची गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी राहिली आहे. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी त्यांचे कौतुक केले होते.
गेल्या वर्षभरात विश्रामबागच्या डीबीची कामगिरी चांगली राहिली आहे. बॅगलिफ्टिंगच्या गुन्ह्यांत तीन महिन्यांपूर्वी उस्मानाबाद येथील टोळीस अटक केली होती. हे गुन्हे होऊ नयेत म्हणून डीबी पथक गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील विविध बॅकांत ‘वॉच’ ठेवून आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावलेली आहे. परंतु चोरटे सातत्याने ठिकाण व गुन्ह्याची पद्धत बदलून हात मारत आहेत. चोरट्यांना पकडणे आव्हानात्मक आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी सक्षम असणारा पोलीस दलातील महत्त्वाचा विभाग आहे. हा विभाग गेल्या तीन-चार महिन्यांत कोमात गेला असल्याचे चित्र आहे. घरफोडींचा छडा व फरारी गुन्हेगार पकडण्याशिवाय त्यांची कोणतीही कामगिरी दिसत नाही. अनेकदा विश्रामबागची ‘डीबी मागावर’ असलेले गुन्हेगार एलसीबीने पकडले. बॅगलिफ्टिंगच्या शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा एलसीबीकडून छडा लागेल, अशी तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही. गेल्या चार महिन्यांत विश्रामबाग हद्दीत केवळ दोन गुन्हे घडले आहेत. नूतन पोलीसप्रमुख फुलारी यांचे आगमन झाल्यानंतर एक गुन्हा घडला. हाच गुन्हा डीबीने आतापर्यंत केलेल्या कामावर पाणी फिरवून गेला. सहा महिन्यांपूर्वी मुंबईतून दोन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या महिलेस याच डीबीने पकडले होते. सातत्याने डीबीची काही ना काही कामगिरी असताना, डीबीची शाखा बरखास्तीचा तडकाफडकी निर्णय झाल्याने याची मंगळवारी दिवसभर चर्चा होती. या शाखेतील अधिकारी व पोलीस कर्मचारी मंगळवारी गणवेशात ड्युटीवर आले होते.