बेडग रस्त्यावर तिघांना दहा हजाराला लुटले
By Admin | Updated: November 29, 2015 01:01 IST2015-11-29T00:54:45+5:302015-11-29T01:01:52+5:30
चोरटे अंधारात पसार

बेडग रस्त्यावर तिघांना दहा हजाराला लुटले
मिरज : मिरज-बेडग रस्त्यावर शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी टेम्पो अडवून मारहाण करून १० हजार रुपये लुटले. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेतला, मात्र चोरटे अंधारात पसार झाले.
बेडग परिसरातील शेतकरी दररोज भाजीपाला विक्रीसाठी कोल्हापूर येथे जातात. शुक्रवारी रात्री अकरा वाजता भाजी-विक्री करून परत येणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो बेडगजवळ अज्ञात चोरट्यांनी अडविला. टेम्पोतील तीन शेतकऱ्यांना काठ्यांनी मारहाण करून त्यांच्याजवळील दहा हजार रुपये रोख रक्कम लुटली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्यासह पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. मात्र चोरटे अंधारात गायब झाले. पारधी गुन्हेगारांनी हा प्रकार केल्याचा पोलिसांचा संशय आहे, मात्र लुटीच्या प्रकाराबाबत पोलिसांत नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी याच पध्दतीने बेडग रस्त्यावर टेम्पो अडवून शेतकऱ्यांना मारहाण करून लुटण्याचा प्रकार घडला होता. (वार्ताहर)