बाबांची लोकसेवेची वाटचाल आमच्यासाठीही प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:49+5:302021-05-17T04:24:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना व लॉकडाऊनमध्ये अवघे जग घरकोंबडा झाले आहे. असंख्य मुलांना प्रथमच आपल्या पालकांचा इतका ...

बाबांची लोकसेवेची वाटचाल आमच्यासाठीही प्रेरणादायी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना व लॉकडाऊनमध्ये अवघे जग घरकोंबडा झाले आहे. असंख्य मुलांना प्रथमच आपल्या पालकांचा इतका प्रदीर्घ सहवास मिळाला आहे. पोलीस आणि डॉक्टरांच्या मुलांची स्थिती मात्र नेमकी याच्या उलट आहे. एरवी दिवसातून किमान बारा तास वाट्याला येणारे आई-वडील कोरोनाच्या आपत्तीमध्ये १२ ते १५ तास घराबाहेर राहत आहेत.
या दुराव्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहेत. त्यांचा आढावा घेतला असता मुले दोन्ही बाजूंनी व्यक्त झाली. अनेकांचा सूर सकारात्मक दिसून आला. नोबल प्रोफेशन मानल्या जाणाऱ्या डॉक्टरांच्या मुलांना पालकांच्या दैनंदिनीची सवय असते. अनेकदा पालकांच्या मोबाइलवर रात्री-बेरात्री येणारे रुग्णांचे कॉल मुलेच उचलत असल्याने रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या जाणिवेतच मुले मोठी होत असतात. कोरोनाकाळात ही जाणीव मोठी झाली आहे. डॉक्टर आई-वडिलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती कायम असतानाही ही मुले अत्यंत जबाबदारीने वागताना आढळली.
पोलिसांच्या मुलांची मानसिकता मात्र संमिश्र आहे. बारा तासांची ड्युटी संपली की वडील आपले असतात याची आतापर्यंत निश्चिती होती. कोरोनाकाळात मात्र सुरक्षिततेची चिंता वाढली आहे. सध्या पोलिसांना फक्त बंदोबस्ताचेच काम असल्याने घरच्यांनाही पुरेसा वेळ देता येत आहे; पण रस्त्यावर असताना कोरोनापासून सुरक्षिततेची चिंता पोलिसांबरोबरच त्यांच्या मुलांनाही लागून राहत आहे. विशेषत: पोलीस वसाहतीत या चिंतेचा रंग अधिक गहिरा आहे.
पॉईंटर्स
कोरोनायोद्धे
शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर्स - ६०५
आरोग्य कर्मचारी - १,५७०
पोलीस अधिकारी - १५४
पोलीस कर्मचारी - २,५८४
कोट
आम्ही पोलिसांची मुले...
बाबा घरातून बाहेर पडतात, तेव्हा काळजी वाटते; पण ते कोरोनाविरोधातील लढ्यात सहभागी असल्याचा अभिमान वाटतो. आमच्यासाठी ते आयडॉल आहेत. कोरोनाकाळात त्यांच्या नोकरीचे महत्त्व अधिक जाणवले.
- अजिंक्य अभिजित गायकवाड, तासगाव
पोलिसाची मुलगी म्हणून अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. दिवसभर बाबा कोरोना ड्युटीवर असले तरी घरी परतल्यावर ते पूर्णपणे आमचे असतात. कोरोनामध्ये लोकांची काळजी घेण्याबरोबरच आमचीही पुरेपूर काळजी घेतात. त्यांचा आदर्श नेहमीच माझ्यापुढे असतो.
- ऋतुजा सचिन कुंभार, पुणदी
मोठा झाल्यावर पोलीस अधिकारी व्हायला आवडेल. कोरोनाच्या संकटात पोलिसांच्या ड्युटीचे महत्त्व आणखी वाढले आहे. समाजातूनही पोलिसांप्रती व्यक्त होणाऱ्या आदराच्या भावना पाहून अभिमान वाटतो. स्वत:सोबतच समाजाच्या सुरक्षिततेची काळजी करणाऱ्या पोलीस खात्याचा अप्रत्यक्ष घटक म्हणूनही धन्यता वाटल्याशिवाय राहत नाही.
- प्रज्योत पांडुरंग खरात, मिरज
कोट
आम्ही तर देवदूतांची मुले...
कोरोनाकाळात वडिलांवरील जबाबदारी वाढली आहे. आम्हाला पूर्वीपेक्षा कमी वेळ उपलब्ध होत आहेत; पण त्यांनी केलेल्या उपचारांनंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलणारा आनंद पाहून आमचेही चेहरे फुलतात. कोरोनामुळे डॉक्टर जणू देवदूतच ठरले आहेत. या देवदूतांची मुले म्हणून अभिमान वाटतो. मोठेपणी डॉक्टरच व्हायला आवडेल.
- युवराज नंदकिशोर गायकवाड, सांगली
कोरोनामुळे बाबांना रुग्णांसाठी जास्त वेळ द्यावा लागत आहे. संसर्गापासून ते स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच आमचीही काळजी घेतात. शेकडो लोकांना वेदनामुक्त करतात. त्यामुळे मोठेपणी डॉक्टर होऊन लोकांची दु:खे दूर करायला आवडेल. कोरोनाकाळात बाबा आमचे हिरो ठरलेत.
- शैार्य अमोल पाटील, सांगली
कोरोनाकाळात रुग्णसेवेसाठी अनेकदा रात्री-बेरात्री बाबांना धावपळ करावी लागते. पूर्वीप्रमाणे आम्हाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत; पण त्यांच्या धावपळीमुळे समाजाचा फायदा होत असल्याने आनंद वाटतो. मोठेपणी हा आनंद वाटण्यात माझाही सहभाग असेल हे आताच निश्चित केले आहे.
- राजवर्धन भगतसिंग कदम, इस्लामपूर
कोरोनाकाळात पालक आणि मुलांमधील अंतर वाढले आहे. डॉक्टर व पोलीस कर्मचारी अधिकाधिक वेळ घराबाहेर राहत असल्याने ते मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, त्यामुळे मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अशावेळी घरातील महिलांचीही जबाबदारी वाढते. पालकांच्या धावपळीची मुलांना एरवी सवय असली तरी सध्याचा काळ जास्त संवेदनशील आहे. शाळा सुरू नसल्याने मुले कित्येक दिवस घरातच आहेत, अशावेळी त्यांना पालकांची गरज जास्त आहे. नेमक्या याच वेळेत डॉक्टर व पोलिसांवरील जबाबदारी वाढल्याने मुलांसाठी वेळ देणे मुश्कील होत आहे.
- अर्चना मुळे, समुपदेशक, सांगली