बाजार समिती सभापतीपदी अविनाश पाटील
By Admin | Updated: August 27, 2015 23:16 IST2015-08-27T23:16:32+5:302015-08-27T23:16:32+5:30
तासगावमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष : उपसभापतीपदी सतीश झांबरे बिनविरोध

बाजार समिती सभापतीपदी अविनाश पाटील
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अविनाश पाटील यांची, तर उपसभापतीपदी सतीश झांबरे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपनिबंधक शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाली होती. सातशे कोटीहून अधिक उलाढाल असणाऱ्या या बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
निवडीपूर्वी संचालकांच्या झालेल्या बैठकीत सभापती पदासाठी अविनाश पाटील यांचे, तर उपसभापती पदासाठी सतीश झांबरे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या निवडीच्या कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याहस्ते सभापती, उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक अजितराव जाधव, धनाजी पाटील, संपतराव सूर्यवंशी, राजाराम पाखरे, रवींद्र पाटील, जयसिंग जमदाडे, दिनकर पाटील, साहेबराव पाटील, नवनाथ मस्के, लक्ष्मण पाटील, पुष्पा पाटील, रंजना पाटील, कुमार शेटे यांच्यासह स्मिता पाटील, युवराज पाटील, हणमंत देसाई, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. चिंंचणी आणि डोंगरसोनी येथेही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (वार्ताहर)
आबांच्या नावाने बेदाणा मार्केटचा विस्तार
आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवली. मतदारांनी मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. मतदारांचा हा विश्वास यापुढील काळात सार्थ ठरवला जाईल. आर. आर. आबांच्या नावाने विस्तारित बेदाणा मार्केटचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्याला प्राधान्य राहील. तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समितीवर सभापती म्हणून काम करण्याची संधी आमदार सुमनतार्इंनी दिलेली आहे. सर्व संचालकांनी एकमताने सभापती आणि उपसभापतींची निवड केली आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून पारदर्शी कारभार करू, असा विश्वास बाजार समितीचे नूतन सभापती अविनाश पाटील यांनी व्यक्त केला.