‘कृष्णे’च्या रणांगणावर अविनाश मोहिते आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:58+5:302021-02-10T04:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे रणांगण काही महिन्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलची ...

‘कृष्णे’च्या रणांगणावर अविनाश मोहिते आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे रणांगण काही महिन्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. सत्ताधारी सहकार पॅनेलची ताकद मोठी आहे. रयत पॅनेलचे नेते काही अटींवर संस्थापक पॅनेलशी समझोता करण्यास तयार असल्याचे समजते; परंतु संस्थापक पॅनेल मात्र तडजोडीला तयार नसल्याचे वृत्त आहे.
सत्ताधारी सहकार पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड, वाळवा आणि कडेगाव तालुक्यांत संपर्क वाढविला आहे. सध्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याचे सहकार पॅनेलमधून सांगितले जात आहे. हाच त्यांच्या जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दा असेल. याउलट रयत पॅनेलच्या डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कारखाना कसा तोट्यात चालला आहे, याचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत संस्थापक पॅनेलबरोबर काही अटींवर जुळवून घेण्यास मोहिते तयार असले तरी या तडजोडीला संस्थापक पॅनेल तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहकार पॅनेलची बाजू भक्कम असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे उंबरठे झिजविताना दिसत आहेत.
एकीकडे रयत पॅनेलने काँग्रेसची कास धरून संस्थापक पॅनेलला जवळ घेण्याची रणनीती आखली असली, तरी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते तडजोड करण्यास तयार नाहीत. एकाकी झुंज देण्याच्या विचारात संस्थापक पॅनेल असल्याने अविनाश मोहिते यांनी गट कार्यालयावर धडक मारण्याची भूमिका घेतली आहे. वाळवा, शिराळ्यातील काही कार्यकर्त्यांनी संस्थापक पॅनेलच्या उमेदवारासाठीही फिल्डिंग लावली आहे.
फोटो - ०९०२२०२१-आयएसएलम-इस्लामपूर न्यूज
डॉ. सुरेश भोसले, अविनाश मोहिते