मिरजेत पाणी योजनांंवरून अधिकारी धारेवर
By Admin | Updated: February 9, 2015 23:56 IST2015-02-09T23:35:28+5:302015-02-09T23:56:54+5:30
चौकशीसाठी समिती : पंचायत समिती सभेत सदस्यांचा सभात्याग

मिरजेत पाणी योजनांंवरून अधिकारी धारेवर
मिरज : मिरज तालुक्यातील भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल पाणी योजनांच्या अपूर्ण कामांबद्दल आज (सोमवारी) जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यास सदस्यांनी धारेवर धरले. जनतेचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडविण्यापेक्षा ठेकेदारांना पोसण्याचे काम होत असल्याचा आरोप करीत, कार्यकारी अभियंता एस. जी. सादिलगे यांचा निषेध करीत सदस्य सतीश निळकंठ यांनी सभात्याग केला. शिंदेवाडी पाणी योजनेवरून सदस्यांतही वादावादी झाली. तालुक्यातील अपूर्ण पाणी योजनांच्या कामांची समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय पंचायत समितीच्या सभेत घेण्यात आला.
मिरज पंचायत समितीची सभा सभापती दिलीप बुरसे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती तृप्ती पाटील, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांच्या उपस्थितीत पार पडली. तालुक्यातील भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अपूर्ण कामांवरुन सभेत जोरदार खडाजंगी झाली. सिध्देवाडी येथील भारत निर्माण योजनेचे काम पूर्ण असल्याचे सांगितले जाते. योजना पूर्ण असताना जलशुध्दीकरणाची व्यवस्था न करता तलावातून दूषित पाणीपुरवठा का केला जातो, असा सवाल सतीश निळकंठ यांनी केला. या योजनेतून सात वर्षात शुध्द पाणी मिळत नाही, कागदोपत्री खर्च दाखवून निधी हडप केल्याने या योजनेवर खर्च करण्यात आलेला १ कोटी ३० लाखांचा निधी पाण्यात गेल्याचा आरोपही केला. हा प्रश्न आपल्या शिंदेवाडीत सुरु असलेल्या पाणी योजनेचा असल्याचा समज झाल्याने सदस्य शंकर पाटील यांनी, आमच्या गावाच्या योजनेच्या प्रश्नावर कोणी चर्चा करायची नाही, असे बजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निळकंठ, बाबासाहेब कांबळे व पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. पाटील यांच्या वक्तव्यावर सभापती दिलीप बुरसे यांनीही आक्षेप घेतला. शिंदेवाडी योजनेचा वारंवार उल्लेख झाल्याने वाद टोकाला पोहोचला.
मल्लेवाडी योजनेच्या कामाचे अद्याप मूल्यांकन नसताना, बिले काढण्याचा प्रशच्न येत नाही, मग बिले काढण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन एकनाथ नागरगोजे यांच्यावरील कारवाईवर निळकंठ व कांबळे यांनी आक्षेप घेतला. आठ पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण असताना बिले अदा केली जात आहेत. ठेकेदारांना पाठीशी घालून तालुक्यातील पाणी योजनांची वाट लावण्यास सादिलगे कारणीभूत असून त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगत निळकंठ यांनी सभागृह सोडले.
राणी देवकारे यांनी टाकळी-बोलवाड योजनेच्या चाचणी काळातील वीज बिलाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी तालुक्यातील अपूर्ण व वादग्रस्त पाणी योजनांच्या कामांची समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेस अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. सभेस अधिकाऱ्यांनीच उपस्थित राहावे, प्रतिनिधींना येण्यास मज्जाव केला जाईल, असे सभापती बुरसे यांनी सांगितले. चर्चेत अशोक मोहिते, प्रवीण एडके यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
सभापतींनी कामाचा अहवाल मागविला
मिरज तालुक्यातील भारत निर्माण व राष्ट्रीय पेयजेल योजनेच्या सुरू असलेल्या कामाचा निधी व कामाच्या मूल्यांकनाची माहिती मागूनही देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबतची माहिती तातडीने द्यावी, असा आदेश सभापती बुरसे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव
खंडेराजुरी आरोग्य केंद्राबाहेर महिलेच्या प्रसुतीच्या कारणावरुन वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. शासनाकडून उपलब्ध असणाऱ्या औषधांचा वापर न करता औषधे विकत आणण्यास सांगितली जात आहेत. तक्रारीमुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांची खंडेराजुरीतून बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.