वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेचा आज लिलाव
By Admin | Updated: October 26, 2016 00:19 IST2016-10-25T23:23:12+5:302016-10-26T00:19:34+5:30
५२ कोटींची थकबाकी : प्रशासनाची तयारी

वसंतदादा कारखान्याच्या मालमत्तेचा आज लिलाव
मिरज : सांगलीतील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ५२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी बुधवारी मिरज तहसील कार्यालयात कारखाना मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची देणी देण्यात येत असल्याने जप्ती वसुली प्रक्रिया थांबविण्याची कारखाना प्रशासनाची मागणी तहसीलदारांनी फेटाळली आहे.
वसंतदादा कारखान्याकडून २0१३-१३ च्या ऊस बिलाचे ३९ कोटी शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. याबाबत शेतकरी संघटनेच्या तक्रारीमुळे साखर आयुक्तांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून थकबाकी वसुलीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन वर्षापूर्वी महसूल विभागाने तहसीलदारांमार्फत थकबाकी वसुली प्रक्रिया सुरू करून तीन नोटिसा बजावल्या आहेत. कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्यात आला आहे. थकबाकीची रक्कम ५२ कोटीवर पोहोचली आहे. मात्र कारखान्याने सर्व देणी दिली नसल्याने तहसीलदार शरद पाटील यांनी १५ आॅक्टोबर रोजी कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावाची अंतिम नोटीस बजावली आहे. कारखाना व्यवस्थापनाने थकबाकीपैकी सुमारे ४0 कोटी देणी दिली असल्याने मालमत्तेचा लिलाव थांबविण्याची मागणी केली. मात्र थकबाकीची संपूर्ण रक्कम वसूल होण्यासाठी मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे.
बुधवारी मिरज तहसील कार्यालयात कारखान्याची इमारत वगळता अन्य मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. मालमत्तेची लिलावात विक्री न झाल्यास मालमत्तेच्या सात-बारा उताऱ्यावर मालक म्हणून शासनाची नोंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)