अशोक गायकवाड यांच्या भूमिकेकडे लक्ष
By Admin | Updated: December 16, 2014 00:15 IST2014-12-15T23:01:54+5:302014-12-16T00:15:58+5:30
विटा पालिका पोटनिवडणूक : नागरिकांत उत्सुकता

अशोक गायकवाड यांच्या भूमिकेकडे लक्ष
दिलीप मोहिते - विटा -विटा नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मधील एका जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पालीकेची २०११ ला एकत्रित निवडणूक लढविलेले अशोकराव गायकवाड या पोटनिवडणुकीत सत्ताधारी गटात सामील होणार, विरोधात जाणार, की तटस्थ राहणार, याकडे विटेकरांचे लक्ष लागले आहे.
पालिकेच्या गत निवडणुकीत तत्कालीन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रयत्नातून कॉँग्रेसचे तत्कालीन आ. सदाशिवराव पाटील व त्यांचे कट्टर विरोधक व विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांनी एकत्रित येऊन पालिकेची निवडणूक लढविली. त्यावेळी २३ पैकी सदाशिवराव पाटील यांच्या गटाला १५, अशोकराव गायकवाड समर्थक गटाला ५, तर आ. अनिल बाबर यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला ३ जागा मिळाल्या होत्या.
परंतु, स्वाभिमानी विकास आघाडीतील सौ. रूपाली श्रीमंत मेटकरी यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर त्यांच्या प्रभाग क्र. ६ मधील एका जागेसाठी १८ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे.
विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांच्यात व सत्ताधारी गटात नगराध्यक्ष निवडीवरून दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे गायकवाड यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सदाशिवराव पाटील यांच्या विरोधात प्रचार केला.
अशोकभाऊंनी अद्यापपर्यंत आपला निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीत ते सत्ताधारी गटाचे नेते माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्याशी युती करणार, की विरोधी गटाचे नेते आ. अनिल बाबर यांना पाठिंबा देणार, की तटस्थ राहणार याबाबत शहरात चर्चेला उधाण आले आहे.
विटा पालिकेच्या प्रभाग ६ मध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीबाबत अद्याप कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली नाही. परंतु, नामाप्र महिला उमेदवारासाठी जागा असल्याने उमेदवार मिळविण्यातच मोठी कसरत करावी लागते. ही पोटनिवडणूक कोणत्या पध्दतीने व कशी लढवायची, याचा निर्णय आमचे पाच नगरसेवक घेतील. मी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
- अशोकराव गायकवाड,
अध्यक्ष, विकास आघाडी, विटा
मोर्चेबांधणीस वेग
२०११ च्या निवडणुकीत सत्ताधारी गटात सहभागी झाल्यानंतर अशोकराव गायकवाड यांना पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र, अशोकभाऊंचे पाचही नगरसेवक विरोधात आहेत. त्यांना विरोधी स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगरसेवकांची साथ मिळाली आहे. परंतु, त्यातील एक नगरसेवक पद रिक्त झाल्याने त्यांच्याकडे आता सभागृहात ७ सदस्य संख्याबळ आहे. प्रभाग ६ साठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विरोधी गटासह सत्ताधारी व अशोकराव गायकवाड समर्थकांनी मोठी फिल्डिंग लावली आहे.