इस्लामपूरच्या विकासासाठी आरक्षणे उठविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:36+5:302021-09-22T04:29:36+5:30
इस्लामपूर येथे वाघवाडी रस्त्याच्या रूंदीकरणाचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्याहस्ते ढाले. यावेळी प्रा. शामराव पाटील, दादासाहेब पाटील, ॲड. चिमण डांगे, ...

इस्लामपूरच्या विकासासाठी आरक्षणे उठविण्याचा प्रयत्न
इस्लामपूर येथे वाघवाडी रस्त्याच्या रूंदीकरणाचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्याहस्ते ढाले. यावेळी प्रा. शामराव पाटील, दादासाहेब पाटील, ॲड. चिमण डांगे, संजय कोरे, शहाजी पाटील, आनंदराव मलगुंडे, एस. आर. काटकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : विकास आराखड्यातील आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. मात्र, शहराच्या विकासकामांसाठी ज्यांच्यावर आरक्षण पडले आहे, ते काढले जावे ही आमची भूमिका असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
इस्लामपूर ते वाघवाडी व इस्लामपूर ते बहे या २१ कोटी रुपये खर्चाच्या दोन रस्त्यांचे भूमिपूजन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. प्रा. शामराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, गटनेते संजय कोरे, कार्यकारी अभियंता एस. आर. काटकर उपस्थित होते. याप्रसंगी बदली झाल्याबद्दल तहसीलदार रवींद्र सबनीस यांचा तसेच नूतन मुख्याधिकारी वैभव साबळे यांचा सत्कार करण्यात आला.
पाटील म्हणाले, इस्लामपूर शहर झपाट्याने वाढत असून या शहराच्या विकासाला पुन्हा गती देत आहोत. शहराला जोडणारे रस्ते प्रशस्त करून शहराचे दळणवळण वाढवत आहोत. इतर शहरांत टोल लावून हे केले जाते. मात्र, आपण शहरातील नागरिकांना कोणतीही तोशीस बसू दिलेली नाही. शहरात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सर्व मार्गी लावू.
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, ॲड. चिमण डांगे, नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी, डॉ. संग्राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संजय कोरे यांनी स्वागत केले. नगरसेवक बशीर मुल्ला यांनी आभार मानले.
यावेळी माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, अरुणादेवी पाटील, मुनीर पटवेकर, सुभाष सूर्यवंशी, नगरसेवक खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजय पाटील, संजय पाटील, नगरसेविका सुनीता सपकाळ, जयश्री माळी, संगीता कांबळे, वैशाली सदावर्ते, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, माजी नगरसेवक पिरअली पुणेकर, उपअभियंता सुभाष पाटील, गटविकास अधिकारी रवींद्र पवार उपस्थित होते.