तलाठ्याच्या अंगावर वाळूची वाहने घालण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 10, 2014 02:11 IST2014-06-10T01:52:52+5:302014-06-10T02:11:34+5:30
हिंंगणगादेतील प्रकार : वाळू तस्कराचे कृत्य

तलाठ्याच्या अंगावर वाळूची वाहने घालण्याचा प्रयत्न
विटा : येरळा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या तस्कराने महसूल विभागाच्या पथकातील गावकामगार तलाठींच्या अंगावर वाळूने भरलेला डंपर व जेसीबी यंत्र अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजता खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथे घडली. याप्रकरणी नेर्ली (ता. कडेगाव) येथील अजित भाऊसाहेब मुळीक या वाळू तस्कराविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने तीन ब्रास वाळूसह डंपर व जेसीबी यंत्र असा सुमारे २३ लाख ६ हजार ३०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
हिंगणगादे येथील येरळा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या वाळू तस्करी प्रतिबंधक पथकाला मिळाल्यानंतर हिंगणगादेचे गावकामगार तलाठी एस. एस. सुर्वे, एस. व्ही. पाटोळे, एस. ए. कोकणे, एस. एस. महाजन, कोतवाल शामराव कदम यांच्या पथकाने सोमवारी दुपारी याठिकाणी छापा टाकला. यावेळी क्रमांक नसलेल्या जेसीबीने तीन ब्रास वाळू डंपरमध्ये भरल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
छापा पडल्याचे लक्षात येताच अजित मुळीक याने पथकातील तलाठी व कोतवाल यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. पथकाने प्रसंगावधान राखून धाव घेतल्याने अनर्थ टळला. मुळीक व जेसीबीचा चालक वाहने सोडून फरार झाले.
पथकाने वाळूचा पंचनामा करून २३ लाख ६ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेनंतर आज, सोमवारी रात्री उशिरा मुळीक याच्याविरूद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला. तपास हवालदार बी. डी. गावडे करीत आहेत. (वार्ताहर)