विटा : चोरीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयिताने विटा पोलिस ठाण्यातच एका संगणकाच्या वायरने गळा आवळून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास विटा पोलिस ठाण्यातच घडली. प्रकाश शिवाजी चव्हाण (वय ४०, रा. सांडगेवाडी, ता. पलूस ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील हणमंतनगर या उपनगरात संशयित प्रकाश चव्हाण व त्याचा अन्य एक साथीदार चोरी करण्यासाठी गेले होते. सोमवारी पहाटे हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संशयित प्रकाश चव्हाण याला पकडले. तर त्याचा दुसरा साथीदार फरार झाला.यावेळी नागरिकांनी संशयित चव्हाण यास विटा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी चव्हाण यांची दिवसभर कसून चौकशी करून दुसऱ्या साथीदाराचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर संशयित चव्हाण याने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या कायदेशीर अटकेसाठी कार्यवाही सुरू झाली, असे पोलिसांनी सांगितले.त्यावेळी संशयित चव्हाण याला तेथीलच एका खोलीत ठेवून ग्रामीण रुग्णालयात त्याच्या आरोग्य तपासणीसाठी पोलिस पत्र तयार करण्यासाठी बाहेरच्या रूममध्ये बसले होते. त्याचवेळी पोलिसांची नजर चुकवून संशयित चव्हाण याने खोलीतील एका उपकरणाची वायर तोडून त्याने गळा आवळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.यावेळी मोठा आवाज झाल्याने तेथील पोलिसांनी खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी चव्हाण यांच्या गळ्याला आवळलेली वायर काढली. या प्रकारामुळे चव्हाण यांच्या गळ्याला मोठी इजा झाली आहे. पोलिसांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नातेवाईकांचा विटा पोलिस ठाण्यासमोर गोंधळया घटनेची माहिती मिळताच संशयित चव्हाण यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता विटा पोलिस ठाण्यात येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. त्यानंतर चिंचणी-वांगी, कडेगाव, आटपाडी पोलिसांना पाचारण करण्यात आले. संशयित चव्हाण यांच्यावर उपचार सुरू असलेल्या विटा येथील खासगी रुग्णालयातही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेने विटा पोलिसांची चांगली धावपळ झाली असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे.