सिद्धेवाडीत ग्रामसेवक, सदस्यांवर कोरोना संशयित नातेवाइकांचा हल्ल्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:29+5:302021-05-28T04:20:29+5:30
मालगाव : सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे कोरोनाबाधित रुग्णाला विलगीकरण कक्षात दाखल होण्याची विनंती करण्यास ...

सिद्धेवाडीत ग्रामसेवक, सदस्यांवर कोरोना संशयित नातेवाइकांचा हल्ल्याचा प्रयत्न
मालगाव : सिद्धेवाडी (ता. मिरज) येथे कोरोनाबाधित रुग्णाला विलगीकरण कक्षात दाखल होण्याची विनंती करण्यास गेलेल्या ग्रामसेवक व दक्षता समितीच्या सदस्यांवर शिवीगाळ करीत काठ्या व कुऱ्हाडी घेऊन हल्ला करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सुरेश शंकर एडके व समाधान राजू एडके या दोघांविरोधात शिवीगाळ, अंगावर धावून जाणे व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सिद्धेवाडी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना आपत्ती निवारण, दक्षता समितीने गावात कडक निर्बंध राबविले आहेत. बुधवारी रॅपिड अँटिजन तपासणीत एक महिला कोरोना संशयित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना विलगीकरण कक्षात दाखल होण्याची सूचना ग्रामसेवक विनायक मोरे, आनंदा एडके, प्रकाश नाईक यांनी दिली. कोरोना संशयित महिलेचे नातेवाईक शंकर एडके यांनी विलगीकरण कक्षात दाखल होण्यास विरोध करीत शिवीगाळ केली. घरी येणारा रस्ता बैलगाडी, काटेरी झुडपे टाकून बंद केला. विलगीकरण कक्षात दाखल करण्यास नातेवाईक मज्जाव करीत असल्याने ग्रामसेवक मोरे यांनी ही माहिती दक्षता समितीला दिली. दक्षता समितीचे पदाधिकारीही वेळीच दाखल झाले. त्यांनीही सदर कोरोना संशयित महिलेस विलगीकरण कक्षात दाखल करण्याची विनंती केली. महिलेचे नातेवाईक सुरेश शंकर एडके व समाधान राजू एडके यांनी ग्रामसेवक, दक्षता समितीचे अध्यक्ष, सदस्यांना शिवीगाळ करीत हातात काठी, कुऱ्हाड घेऊन अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करणे, हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी सुरेश एडके, समाधान एडके यांच्याविरोधात कारवाई करण्याची लेखी तक्रार दक्षता समितीचे अध्यक्ष रामचंद्र वाघमोडे, अशोक गरंडे, सागर माने, बाळासाहेब व्होनमाने, प्रथमेश कुरणे, महावीर खोत, दादासाहेब धडस, भाऊसाहेब खरात, ग्रामसेवक विनायक मोरे, तलाठी पी. जी. लोंढे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात दिली आहे.
चौकट
विघ्नसंतोषींकडून चिथावणी
गावात कोरोनाने थैमान घातले असल्याने कोरोना संशियातांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी व्यक्तींकडून विलगीकरण कक्षात दाखल न होण्यासाठी संशयित रुग्णाच्या नातेवाइकांना चिथावणी देत ग्रामसेवक, दक्षता समिती पदाधिकाऱ्यांच्या अंगावर सोडत गावात शांतता सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार आहे. चिथावणीखोरांची नावे संबंधित विभागास देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.