कुपवाडमध्ये सराफास लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:27 IST2021-01-25T04:27:15+5:302021-01-25T04:27:15+5:30

कुपवाड : शहरातील सूरज आनंदराव पवार या सराफ व्यावसायिकाला शुक्रवारी रात्री दोन चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन हातातील बॅग हिसडा ...

Attempt to rob Sarafas in Kupwad | कुपवाडमध्ये सराफास लुटण्याचा प्रयत्न

कुपवाडमध्ये सराफास लुटण्याचा प्रयत्न

कुपवाड : शहरातील सूरज आनंदराव पवार या सराफ व्यावसायिकाला शुक्रवारी रात्री दोन चोरट्यांनी दुचाकीवरून येऊन हातातील बॅग हिसडा मारून लुटण्याचा प्रयत्न केला. पवार रस्त्यावर पडल्याने किरकोळ जखमी झाले. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सूरज पवार यांचे आर. पी. पाटील चौकात सोन्या-चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री पवार दुकान बंद करून घरी चालत जात होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून दोघे चोरटे आले. त्यातील दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने पवार यांच्या हातातील बॅग हिसडा मारून लुटण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पवार रस्त्यावर पडल्याने त्यांच्या उजव्या हाताला मार लागला आहे. तरीही त्यांनी हातातील बॅग सोडली नाही. बॅग हातात आली नसल्याचे पाहून चोरट्यांनी जुना बुधगाव रस्त्यावरून धूम ठोकली.

जखमी पवार यांना नातेवाइकांनी मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. शनिवारी दुपारी पवार यांनी कुपवाड पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Attempt to rob Sarafas in Kupwad