सांगलीत पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST2021-05-18T04:28:23+5:302021-05-18T04:28:23+5:30
सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरात नाकाबंदीदरम्यान अडविल्याच्या कारणावरून एकाने पोलिसास दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला व कमरेखाली लाथ घालून ...

सांगलीत पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न
सांगली : शहरातील विश्रामबाग परिसरात नाकाबंदीदरम्यान अडविल्याच्या कारणावरून एकाने पोलिसास दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला व कमरेखाली लाथ घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. रवींद्र विठ्ठल सूर्यवंशी (वय ३०, रा. गल्ली क्र. ३, श्रीरामनगर, वानलेसवाडी, सांगली) असे संशयिताचे नाव असून पोलीस कर्मचारी सचिन पवार यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. शहरातील विश्रामबाग चौकात तपासणीसाठी चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास संशयित सूर्यवंशी हा चारचाकी (क्र. एमएच. १०, सी.ए. ६४३८ ) घेऊन चालला होता. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी सचिन पवार यांनी त्यास थांबवत, बाहेर फिरत असल्याबद्दल कारण विचारले. याचा राग येऊन सूर्यवंशी याने दमदाटी सुरू केली. त्यानंतर तो कारमधून बाहेर आला व त्याने पवार यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडत लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यानंतर तिथेच पडलेला दगड घेऊन त्याने तो फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार यांनी तो चुकवला. तरीही तरीही आक्रमक होत संशयित सूर्यवंशी याने पवार यांच्या कमरेखालील भागावर लाथ मारत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पवार यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रवींद्र सूर्यवंशी याच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्यासह संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.