औद्योगिक वसाहतीमधून माथाडी कायदा हद्दपारसाठी प्रयत्नशील
By Admin | Updated: May 23, 2015 00:28 IST2015-05-22T23:25:28+5:302015-05-23T00:28:49+5:30
सतीश मालू : प्रचार प्रारंभाने ‘कृष्णा व्हॅली’च्या निवडणुकीत रंगत

औद्योगिक वसाहतीमधून माथाडी कायदा हद्दपारसाठी प्रयत्नशील
कुपवाड : उद्योजकांसाठी त्रासदायक असलेला माथाडी कायदा कुपवाड औद्योगिक वसाहतीसह इतर वसाहतींमधून हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स स्वाभिमानी उद्योजक व्यापारी एकता पॅनेलचे प्रमुख सतीश मालू यांनी पॅनेलच्या प्रचार प्रारंभप्रसंगी व्यक्त केले. पॅनेलचा प्रचार प्रारंभ समृध्दी इंडस्ट्रीजचे मालक ओमप्रकाश मालू यांच्याहस्ते करण्यात आला.
कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स या उद्योजक संघटनेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक होत आहे. बारा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी ‘स्वाभिमानी उद्योजक व्यापारी एकता पॅनेल’ आणि ‘उद्योग विकास आघाडी’ अशी दोन पॅनेल निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहेत. स्वाभिमानी या सत्ताधारी पॅनेलची जबाबदारी पॅनेलप्रमुख सतीश मालू व शिवाजी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे, तर विरोधी असलेल्या उद्योग विकास आघाडीची जबाबदारी अशोक कोठावळे व डी. के. चौगुले यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढली असून कृष्णा व्हॅली चेंबरची दोन्ही पॅनेल जोरदार प्रयत्न करीत आहेत.
यावेळी उमेदवार चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, सतीश मालू, दीपक मर्दा, जयपाल चिंचवाडे, हरी गुरव, रतिलाल पटेल, गुंडू एरंडोले, रमेश आरवाडे, पांडुरंग रूपनर, अनंत चिमड, विपुल शहा उपस्थित होते. (वार्ताहर)
उद्योजकांच्या गाठीभेटीसाठी धावपळ...
एमआयडीसीमध्ये प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत. त्यातच सत्ताधारी व विरोधी दोन्ही पॅनेलच्या प्रचार प्रारंभानंतर उमेदवारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. उद्योजकांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीसाठी उभारलेले उमेदवार उद्योग संभाळत मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत असल्याने, धावपळ उडाली आहे.