सांगलीत शर्जीलचा पुतळा दहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:36+5:302021-02-06T04:47:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूंविरोधी वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व ...

सांगलीत शर्जीलचा पुतळा दहनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूंविरोधी वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व परिषदेच्या आयोजकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी शिवप्रतिष्ठानच्यावतीने शर्जीलच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पुतळा दहनाचा प्रयत्न करताना पोलीस व कार्यकर्त्यांत झटापट झाली.
पुण्यातील एल्गार परिषदेत शर्जील उस्मान याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे सांगलीत संतप्त पडसाद उमटले आहेत. शिवप्रतिष्ठानच्यावतीने सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शर्जील उस्मान याच्या प्रतिकात्मक पोस्टरला व पुतळ्याला जोडे मारून शर्जील उस्मानचा निषेध नोंदवला. ‘मुर्दाबाद, मुर्दाबाद शर्जील उस्मान मुर्दाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी शर्जील उस्मान याचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांकडून हा पुतळा काढून घेतला. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली.
यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले म्हणाले की, सडक्या मेंदूच्या शर्जील उस्मानने हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. हे संतापजनक आहे. वास्तविक हिंदू समाजाने आजपर्यंत कोणावर आक्रमण केले नाही. हा इतिहास आहे, पण शर्जील उस्मान समाजात आणि जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्यामुळे शर्जीलवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याचबरोबर या परिषदेचे आयोजक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह परिषदेच्या नेत्यांवरही अटकेची कारवाई झाली पाहिजे. तसेच यापुढे महाराष्ट्रात एल्गार परिषदेला सरकारने परवानगी देऊ नये, अन्यथा शिवप्रतिष्ठान एल्गार परिषद उधळून लावेल, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनात चौगुले यांच्यासह प्रशांत गायकवाड, राहुल बोळाज, सचिन पाटील, अशोक शेट्टी, आनंद चव्हाण, सतिश खांबे, सचिन मोहिते, भूषण गुरव, प्रकाश निकम, सचिन देसाई, जयदीप चेंडके आदी सहभागी झाले होते.