जाब विचारणाऱ्यावर कोयत्याने हल्ला
By Admin | Updated: February 8, 2015 00:56 IST2015-02-08T00:54:19+5:302015-02-08T00:56:52+5:30
कामेरीत छेडछाड : महाविद्यालयीन युवतीही जखमी; हल्लेखोराला चोप

जाब विचारणाऱ्यावर कोयत्याने हल्ला
इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास एका माथेफिरुने २३ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला चढविला, तर सोबतच्या युवकाच्या डाव्या पायावर वार करून त्याचा पाय मोडला. घटनेनंतर नागरिकांनी हल्लेखोर तरुणाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
जितेंद्र बापू सूर्यवंशी (रा. बुरुड गल्ली, इस्लामपूर) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात स्मिता अरुण पाटील (२३, रा. कामेरी) व नईम मुबारक नरदेकर (२१, रा. इस्लामपूर) हे जखमी झाले आहेत. दोघांवर इस्लामपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नईम नरदेकरच्या डाव्या पायाची नळी तुटली आहे, तर मुलीच्या उजव्या हातावर वार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्मिता पाटील ही एम. बी. ए.ची विद्यार्थिनी आहे. मैत्रिणीचा लॅपटॉप वसतिगृहातील खोलीवर राहिल्याने तो देण्यासाठी ती दुचाकीवरून इस्लामपूरकडे येत होती. त्यावेळी जितेंद्र सूर्यवंशी दुचाकीवरून तिचा पाठलाग करू लागला. तिच्याकडे पाहून हसू आणि खुणावू लागला. त्याच्या या पाठलागामुळे घाबरलेल्या युवतीने आष्टा नाका परिसरातून गाडीचा वेग वाढवला व ती पुढे निघून आली. तिने दूरध्वनीवरुन नईम नरदेकर याला घटनेची माहिती दिली. पोलीस ठाण्याच्या परिसरात नईम थांबला होता. तेथे स्मिता पाटील आली. त्यापूर्वीच जितेंद्र सूर्यवंशी तेथे येऊन थांबला होता. ‘हा मुलगा माझा पाठलाग करीत होता’, असे स्मिताने नईमला सांगितले. त्यावर नईमने त्याला हटकत, ‘मुलीचा पाठलाग करतोस काय? चल पोलीस ठाण्यात’, असे म्हणताच जितेंद्र तेथून निघून गेला.
त्यानंतर स्मिता व नईम हे वेगवेगळ्या दुचाकीने वसतिगृहात गेले. तेथील लॅपटॉप घेऊन तो मैत्रीण दीपालीला दिला व तेथून पुन्हा हे तिघे कामेरीला आले. त्यापूर्वीच जितेंद्र कामेरी येथील बसस्थानकावर कोयता घेऊन थांबला होता. स्मिताने तिच्या आईला, वसतिगृहावर जाते असे सांगितले व तिची मैत्रीण दीपाली आणि नईमसह पुन्हा इस्लामपूरकडे यायला निघाली. त्यावेळी बसस्थानकाजवळ थांबलेल्या जितेंद्र सूर्यवंशी याने नईमवर कोयत्याने हल्ला चढविला. यामध्ये त्याच्या डाव्या पायावर जबर वार बसले. स्मिताने हा हल्ला थोपविण्याचा प्रयत्न केल्यावर जितेंद्रने तिच्या उजव्या हातावर वार करून तिलाही जखमी केले. हा प्रकार बसस्थानकावरील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तेथे धाव घेत जितेंद्रला चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. स्मिता पाटील हिने पोलिसांत फिर्याद दिली असून, जितेंद्रविरुद्ध विनयभंगासह गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद केला आहे. (वार्ताहर)