वाळू तस्करांचा नायब तहसीलदारांवर हल्ला

By Admin | Updated: December 25, 2016 23:56 IST2016-12-25T23:56:02+5:302016-12-25T23:56:02+5:30

वांगीतील घटना : मोटारीवर ट्रॅक्टर घातला

Attack of the sand smugglers tahsildars | वाळू तस्करांचा नायब तहसीलदारांवर हल्ला

वाळू तस्करांचा नायब तहसीलदारांवर हल्ला

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे वाळूचोरी रोखण्यासाठी गेलेले कडेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विलास भिसे, अव्वल लिपिक जयवंत लाड व अव्वल कारकून यांच्या मोटारीवर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक शेखर नाथाजी मोहिते (रा. वांगी) याच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरही जप्त केला आहे.
नायब तहसीलदार विलास भिसे व अव्वल लिपिक जयवंत लाड हे मोटारीतून (एमएच १४ बीके १०५४) वांगी परिसरातील वाळूचोरी रोखण्यासाठी वांगी-शेळकबाव रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी येरळा पात्रातून वाळू भरून येणारा ट्रॅक्टर (एमएच १० एवाय ३०३०) त्यांना दिसला. भिसे यांनी या ट्रॅक्टरचा चालक शेखर नाथाजी मोहिते यास थांबविले. महसूलच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर पकडल्याचे लक्षात येताच शेखर याने ‘तुम्ही बाजूला व्हा, मला जाऊ द्या’, असे म्हणत ट्रॅक्टर चालू करून अधिकाऱ्यांच्या मोटारीवर ट्रॅक्टर घालून तेथून ट्रॅक्टरसह पलायन केले. भिसे व लाड यांनी ट्रॅक्टरचा पाठलाग केला; पण ट्रॅक्टर शिवणी (ता. कडेगाव) येथे रस्त्यालगत घरासाठी पाडण्यात आलेल्या चरीत अडकला. ट्रॅक्टर चरीतून निघणार नाही हे लक्षात येताच चालक मोहिते पळून गेला. भिसे यांनी चिंचणी-वांगी पोलिसांत जाऊन तक्रार दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोलवणकर यांनी ट्रॅक्टरच्या क्रमांकावरून मालकाची माहिती घेतली. त्यावेळी हा ट्रॅक्टर कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील आनंदा यशवंत नलवडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. नलवडे यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधून माहिती घेतली. नलवडे यांनी हा ट्रॅक्टर वांगीतील शेखर मोहिते यांच्याकडे असल्याचे सांगितले. रविवारी चालक शेखर मोहिते यास अटक केली. त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर जप्त केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Attack of the sand smugglers tahsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.