विट्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:48+5:302021-05-19T04:26:48+5:30
विटा : विटा शहरात मंगळवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने धुडगुस घालून दोन पोलिसांसह चौघांवर हल्ला केला. यात बंदोबस्तासाठी थांबलेले विटा ...

विट्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा पोलिसांवर हल्ला
विटा : विटा शहरात मंगळवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने धुडगुस घालून दोन पोलिसांसह चौघांवर हल्ला केला. यात बंदोबस्तासाठी थांबलेले विटा पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील सूर्यवंशी व अर्जुन बोडके या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक ७५ वर्षांची वृद्धा व एक नागरिक असे चौघेजण जखमी झाले. पोलीस व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून अखेर त्या कुत्र्याला ठार केले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता घडली.
कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर विटा येथील गांधी चौकात पोलीस कर्मचारी सुनील सूर्यवंशी व अर्जुन बोडके यांच्यासह होमगार्ड बंदोबस्तासाठी थांबले होते. त्यावेळी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने पाठीमागून पोलीस कर्मचारी बोडके यांच्या पायाचा चावा घेतला. त्यावेळी त्यांनी पाठीमागे पाहिले असता त्याच कुत्र्याने पुन्हा त्यांच्या दुसऱ्या पायाचा चावा घेतला. या पिसाळलेल्या कुत्र्यास हटकण्यास गेलेले पोलीस हवालदार सुनील सूर्यवंशी यांनाही पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. त्यानंतर कुत्र्याने शिवाजी चौकाकडे पळ काढला. तेथे एका होमगार्डावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत एका दुचाकीस्वाराचा चावा घेतला. या हल्ल्यानंतर हे कुत्रे पिसाळलेले असल्याचे लक्षात येताच पोलीस व होमगार्ड यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने कुत्र्याचा पाठलाग केला.
त्यावेळी कुत्र्याने उभ्या पेठेतून थेट क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याकडे पलायन केले. तेथेही त्याने एका ७५ वर्षीय वृद्धेचा चावा घेऊन तिला जखमी केले. मात्र पोलिसांनी दुचाकीने पाठलाग करीत पिसाळलेल्या कुत्र्याला कऱ्हाड रस्त्यावर ठार केले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात दोन पोलिसांसह चौघेजण जखमी झाले. जखमी पोलिसांवर प्रथम विटा ग्रामीण रुग्णालय व नंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.