सांगलीत कोरोनाबाधिताच्या घरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST2021-05-03T04:20:56+5:302021-05-03T04:20:56+5:30
सांगली : शहरातील अभयनगर परिसरात एका कोरोनाबाधित रुग्णाच्या घरावर परिसरातील नागरिकांनी हल्ला केला. महापालिकेच्या वतीने घरासमोर लावण्यात आलेला फलक ...

सांगलीत कोरोनाबाधिताच्या घरावर हल्ला
सांगली : शहरातील अभयनगर परिसरात एका कोरोनाबाधित रुग्णाच्या घरावर परिसरातील नागरिकांनी हल्ला केला. महापालिकेच्या वतीने घरासमोर लावण्यात आलेला फलक वाऱ्याने उडून गेला असताना, तो यांनीच काढून टाकल्याच्या समजातून हा प्रकार घडला. रुग्णाची पत्नी, दोन मुली आणि चुलत भाऊ यांना शिवीगाळ करत बेदम मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी बाधिताच्या मुलीने संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अनिता रामचंद्र मोघे, रितेश रामचंद्र मोघे, रामचंद्र मोघे, साजीद पठाण, साहिल बेलीफ, मुन्ना बेलीफ आणि साद बेलीफ यांच्यासह अनोळखी सात अशा १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभयनगर परिसरात राहणाऱ्या फिर्यादी मुलीच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर सध्या होम आयसोलेशनमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘कोविड प्रतिबंधित क्षेत्र’ असा फलक त्यांच्या घरासमाेर लावला होता. शुक्रवारी सायंकाळी वाऱ्यामुळे हा फलक खाली पडला. यावर बाधिताच्या घरातील सदस्यांनीच हा फलक काढून ठेवला असे वाटल्याने संशयितांनी त्यांच्याशी वादावादी सुरू केली.
बाधिताची पत्नी, दोन मुली व भाऊ त्यांना समजावून सांगत होते, मात्र संशयित ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. संशयितांनी त्या घरावर हल्ला करीत दगडफेक करून घराची आणि गाडीची तोडफोड केली. या वादावादीतून कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाणही करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बाधिताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.