कामेरी/येलूर : किरकोळ कारणावरून दोघा व्यावसायिकांत झालेल्या धक्काबुक्कीत चुकून राष्ट्रपुरुषाचा अर्धपुतळा फुटल्याने त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले. इटकरे (ता. वाळवा) येथे आज, मंगळवारी ही घटना घडली. अर्धपुतळा मोडतोडीचा प्रसार सोशल मीडियावरून झाल्यानंतर सायंकाळी संतप्त जमावाने या दोन्ही व्यावसायिकांच्या दुकानांवर हल्ला केला. हॉटेलमधील साहित्याची नासधूस व वाहनांची मोडतोड केली. सध्या गावात तणाव असल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. येडेनिपाणी फाट्यावर पानटपरी व त्याशेजारी किरकोळ खाद्यपदार्थांचे हॉटेल आहे. पानटपरीत राष्ट्रपुरुषाचा अर्धपुतळा होता. आज दुपारी दोनच्या दरम्यान या दोन्ही व्यावसायिकांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. या धक्काबुक्कीत अर्धपुतळा खाली पडल्याने फुटला. त्याचे छायाचित्रण करून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात आले. यामुळे चारशेहून तरुणांचा जमाव येडेनिपाणी फाट्यावर आला. जमावाने हॉटेलवर हल्ला केला. सर्व साहित्याची मोडतोड केली. काही साहित्य रस्त्यावर आणून फेकले. त्यानंतर जमाव हॉटेल व्यावसायिकाच्या इटकरेतील घरावजळ गेला. तेथील तीन मोटारींची (एमएच ०९ ई १४०४ व एमएच १० एक्यू ८३८ आणि एमएच ०९ सीएच ६०९१) मोडतोड करण्यात आली. हातात काठ्या घेऊन जमावाने धुमाकूळ घातल्याने तणाव निर्माण झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आनंद पाटील फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाचा पाठलाग करून लोकांना पांगवले. गावात तणाव असल्याने सर्व व्यवहार बंद होते. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळनंतर तणावपूर्ण शांतता होती. जिल्'ातील पोलीस पथक बंदोबस्तासाठी दाखल झाले आहे. गावातून फिरणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.दोन्ही व्यावसायिकांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अतिरिक्त पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या घटनेचा कोणी जाणीवपूर्वक प्रसार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)संशयितांची नावे निष्पन्न करूजिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत मुंबईत आहेत. या घटनेची त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली. ते म्हणाले की, किरकोळ भांडणातून हा प्रकार घडला आहे. मात्र, त्याचा सोशल मीडियावरून कोणी प्रसार केला, वाहनांची मोडतोड कोणी केली, याचा तपास करून सर्वांची नावे निष्पन्न करू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. या घटनेचे जिल्ह्यात कोठेही पडसाद उमटू नयेत, याची काळजी घेतली आहे.
इटकरेत जमावाचा हॉटेलवर हल्ला
By admin | Updated: November 19, 2014 00:19 IST