मान्सूनपूर्व कामावरून नगरसेवकांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:58+5:302021-06-18T04:18:58+5:30
सांगली : महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचा पहिल्याच पावसात फज्जा उडल्याने अनेक नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. नगरसेविका सविता मदने यांनी अधिकाऱ्यांना ...

मान्सूनपूर्व कामावरून नगरसेवकांचा हल्लाबोल
सांगली : महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचा पहिल्याच पावसात फज्जा उडल्याने अनेक नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. नगरसेविका सविता मदने यांनी अधिकाऱ्यांना दूषित पाण्याचा अभिषेक घालण्याचा इशारा दिला. दिवसभर उपनगरातील नगरसेवकांकडून कर्मचाऱ्यांसोबत पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. नाले, गटारीची स्वच्छता योग्यरीत्या न झाल्यानेच पावसाचे पाणी साचल्याचा आरोपही करण्यात आला.
शहरात बुधवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने अनेक भागांत पाणी साचले. उपनगरे, झोपडपट्ट्यांतही अनेक घरांत पाणी शिरले. नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहत होते. नागरिकांनी सकाळपासून नगरसेवकांना दूरध्वनी करून पाण्याचा निचऱ्याची व्यवस्था करण्याचा तगादा लावला होता. नगरसेविका सविता मदने, जगन्नाथ ठोकळे, शुभांगी साळुंखे, मनोज सरगर, वर्षा निंबाळकर यांच्यासह अनेकजण सकाळपासून आपापल्या वॉर्डात फिरून परिस्थितीचा आढावा घेत होते. शहरात दोनशेहून अधिक घरांत पाणी शिरले होते. पावसामुळे दैना उडालेल्या नागरिकांनी या नगरसेवकांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर नगरसेवकांनी प्रशासनावर खापर फोडत मान्सूनपूर्वच्या उपाययोजनांवर हल्लाबोल केला.
सविता मदने म्हणाल्या की, कुपवाड, वारणाली या परिसरातील नाल्याचे पाणी विजयनगर मार्गे कुंभार मळा येथे जाते. हा नाला बंदिस्त करण्याची मागणी वारंवार केली; पण त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे झाली आहेत. तीही काढली गेली नाही. परिणामी आज पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांत शिरले. नाला बंदिस्तीसाठी नऊ कोटींचा निधी पडून आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना दूषित पाण्याने अभिषेक घालू.
जगन्नाथ ठोकळे यांनीही मान्सूनपूर्व उपाययोजनावर नाराजी व्यक्त केली. भीमनगर, कलानगर परिसरात बिल्डर व आसपासच्या काही लोकांनी नाल्याच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्याने मुख्य रस्त्यावर मोठ्या पाणी साचून राहिल्याचे त्यांनी सांगितले. ठोकळे यांनी स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे, मुकादम राजू चौगुले, विष्णू ऐवळे यांच्यासह या परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले. नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनीही पाण्याच्या निचऱ्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला.
चौकट
कमी कालावधीत पाण्याचा निचरा : रोकडे
शहरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे; पण यंदा नाले, गटारींची सफाई झाल्याने पाणी निचरा कमी कालावधीत झाला. पूर्वी एखाद्या भागात पाच ते सहा तासांनंतर पाण्याचा निचरा होत होता, तेथे आता तासाभरातच पाणी निघून गेले आहे, असे उपायुक्त राहुल रोकडे यांनी सांगितले.