Attack on bank seizure team in Islamabad | इस्लामपुरात बॅँकेच्या जप्ती पथकावर हल्ला

इस्लामपुरात बॅँकेच्या जप्ती पथकावर हल्ला

इस्लामपूर : बंधन बँक गृह फायनान्स लिमिटेड या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने शहराच्या क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील एका मिळकतीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या पथकासोबत झटापट करून पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी करणाºया माजी प्राचार्यासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळकतीचा ताबा घेण्याचा हा थरारक प्रकार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडला.
माजी प्राचार्य जयराम कृष्णाजी पाटील, निखिल पाटील, संध्या पाटील व सोनाक्षी निखिल पाटील (सर्व रा. एकता कॉलनी, महादेवनगर, इस्लामपूर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
प्राधिकृत अधिकारी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम पाटील यांनी कोल्हापूर येथील बंधन बँक गृह फायनान्स लि., शाखा शाहुपुरी येथून ५ वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत राहिल्याने व्याजासह कर्जाची एकूण रक्कम ही अंदाजे ७५ लाख रुपये इतकी होती. या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन जयराम पाटील यांनी या कर्जासाठी तारण दिलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याचे आदेश मिळवले होते.
त्यानुसार मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीमती एस. एस. कुलकर्णी, विभागीय व्यवस्थापक अमित राशिवडेकर, शाखा व्यवस्थापक अजय शिंदे, वसुली अधिकारी नीलेश व्हरकट हे बँकेचे पथक खासगी पंचांसह पोलीस संरक्षणात जयराम पाटील यांच्या मालमत्तेच्या ठिकाणी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे यांच्यासोबत हवालदार दिलीप भगत व इतर ७ पोलीस कर्मचारी या पथकासोबत होते. मंडल अधिकारी मनोहर पाटील यांनी जयराम पाटील यांना जिल्हाधिकाºयांकडून आलेल्या आदेशानुसार तहसीलदारांनी बँकेतर्फे तुमच्या मिळकतीचा ताबा घेण्याकामी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे सांगितले.
त्यानंतर पथकाने मिळकतीचा रितसर ताबा देण्याची विनंती पाटील कुटुंबियांना केली. यावेळी या कुटुंबाने या बँकेच्या पथकासह पोलीस कर्मचाºयांशी झटापट आणि धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. पोलिसांना प्रतिकार वाढत गेल्यावर शेडगे यांनी आणखी अतिरिक्त पोलीस कुमक मागवली.
यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत जयराम पाटील, निखिल पाटील व संध्या पाटील यांना ताब्यात घेतले. सोनाक्षी पाटील हिला ताब्यात घेतल्याबाबत नातेवाईकांना कळवून चौघांना इस्लामपूर पोलीस ठाण्यात आणले.

Web Title:  Attack on bank seizure team in Islamabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.