आष्टा ग्रामीण रुग्णालय डॉक्टरविना सलाईनवर

By Admin | Updated: October 8, 2015 00:26 IST2015-10-07T23:26:26+5:302015-10-08T00:26:36+5:30

रुग्णांचे हाल : अधिष्ठाता महिन्याच्या, तर सहाय्यक दीर्घ रजेवर, एक गैरहजर, एकाचा राजीनामा!

Atta rural hospital doctor Vina Salignair | आष्टा ग्रामीण रुग्णालय डॉक्टरविना सलाईनवर

आष्टा ग्रामीण रुग्णालय डॉक्टरविना सलाईनवर

सुरेंद्र शिराळकर - आष्टा -आष्टा ग्रामीण रुग्णालयात सुमारे महिनाभर डॉक्टरच हजर नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने आष्टा परिसरातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून येथे भव्य ग्रामीण रुग्णालय बांधले. दररोज शंभरावर रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. भोई महिन्याच्या रजेवर आहेत. इतर तिघांपैकी एक रजेवर, तर एक गैरहजर असतात. त्यातच एका डॉक्टरनी राजीनामा दिल्याने ग्रामीण रुग्णालय सर्व सुविधा असूनसुध्दा डॉक्टराअभावी सलाईनवर आहे.वाळवा तालुक्यात इस्लामपूरनंतर सर्वात मोठे गाव असल्याने माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नाने आष्टा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. बसस्थानकामागे भव्य इमारत बांधण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी नजीकच निवासस्थान आहे. ग्रामीण रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया, विविध तपासण्या केल्या जात आहेत. महिला प्रसुती विभागही आहे. नवीन एक्स-रे मशीन व इतर तपासण्यासुध्दा केल्या जातात. दररोज सुमारे १00 ते १५0 रुग्णांची तपासणी केली जाते. आष्टा, कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, नागाव, पोखर्णी, फाळकेवाडीसह परिसरातील रुग्ण येथे येतात.मात्र सुमारे एक महिन्यापासून डॉक्टरच गैरहजर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांसह कर्मचारीही डॉक्टरांची वाट पाहतात. मात्र कर्मचारी उपचार करु शकत नाहीत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. आर. भोई एक महिन्याच्या रजेवर आहेत. इतर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. डी. बी. कांबळे रजेवर, तर डॉ. लक्ष्मी पोळ अनधिकृतरित्या गैरहजर आहेत. डॉ. एस. बी. गावडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर पृथ्वीराज पवार हेही रुग्णालयात थांबून काही वेळ सेवा देत होते. रुग्णांना शासन आधार देणार की डॉक्टर नाहीत म्हणून आष्टा ग्रामीण रुग्णालय बंद पडणार, याची चर्चा सध्या असून, तातडीने डॉक्टरांची नेमणूक करुन रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगरसेवक विजय मोरे यांनी केली आहे.

आंदोलनाचा इशारा
आष्टा येथे सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे खरे, पण गेल्या काही दिवसांपासून येथे डॉक्टरच नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. वरिष्ठांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश माळी, राष्ट्रवादी आष्टा शहर युवकचे उदय कुशिरे, अनिल पाटील यांच्यासह नगरसेवक विजय मोरे यांनी दिला आहे.


आष्टा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नाहीत. मात्र पुढील आठवड्यात नवीन डॉक्टर देण्यात येतील. तात्पुरते दोन डॉक्टर पाठवित आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टरांची भरती कमी झाल्याने अडचणी आहेत. लवकरच त्या सोडविण्यात येतील. आष्ट्यासाठी चार डॉक्टर देण्यात येतील.
- डॉ. बी. एस. कोळी,
निवासी वैद्यकीय अधिकारी, सांगली.

Web Title: Atta rural hospital doctor Vina Salignair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.