हाय प्रोफाइल वेश्या अड्ड्यावरील छाप्यात आटपाडीच्या पोलीस निरीक्षकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:27+5:302021-02-05T07:30:27+5:30
फोटो २९०१२०२१एसएएन०१ : याच हॉटेल रणवीरमध्ये छापा टाकण्यात आला. फोटो २९०१२०२१एसएएन०२ : पोलीस निरीक्षक अरुण देवकरला न्यायालयात नेले जात ...

हाय प्रोफाइल वेश्या अड्ड्यावरील छाप्यात आटपाडीच्या पोलीस निरीक्षकास अटक
फोटो २९०१२०२१एसएएन०१ : याच हॉटेल रणवीरमध्ये छापा टाकण्यात आला.
फोटो २९०१२०२१एसएएन०२ : पोलीस निरीक्षक अरुण देवकरला न्यायालयात नेले जात असताना.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील कर्नाळ रस्त्यावरील हॉटेल रणवीरमध्ये सुरू असलेला हाय प्रोफाइल वेश्या अड्डा सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुरुवारी रात्री उद्ध्वस्त केला. तेथे आटपाडी पोलीस ठाण्याचा निरीक्षक अरुण रामचंद्र देवकर रंगेहाथ सापडला असून, त्याच्यासह तिघांना अटक करण्यात आली, तर तिघे पसार झाले. पोलीस निरीक्षक देवकर ग्राहक म्हणून अड्ड्यावर आढळून आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी हॉटेलमालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र उर्फ रविआण्णा कोरागा शेट्टी, व्यवस्थापक राजेश यादव (तिघेही रा. सांगली), एजंट शिवाजी नारायण गोंधळे उर्फ वाघळे (रा. सिद्धेश्वर कॉलनी, तासगाव), पोलीस निरीक्षक अरुण देवकर (सध्या रा. आटपाडी) आणि सत्यजीत दिगंबर पंडित (रा. ब्राह्मणपुरी, मिरज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाळ रस्त्यावरील हॉटेल रणवीरमध्ये वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांच्या मदतीने या पथकाने हॉटेलवर छापा टाकला असता, दोन महिलांसह सहा जण मिळून आले. त्यात आटपाडी पोलीस ठाण्याचा निरीक्षक देवकर असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हॉटेलमध्ये व्यवस्थापक यादव एजंटांमार्फत ग्राहकांकडून पैसे घेऊन मुली पुरवत होता. एका रात्रीसाठी प्रत्येकी तीन हजार रुपये आकारले जात होते. सध्या या हॉटेलमध्ये मुंबई व उत्तर प्रदेश येथील दोन महिला होत्या. पथकाला याची माहिती मिळताच छापा टाकला. या वेळी आटपाडी येथे कार्यरत असलेला पोलीस निरीक्षक देवकर व पंडित ग्राहक म्हणून आढळून आले. यात एजंट वाघळेसह देवकर व पंडित यांना अटक करण्यात आली असून, तिघे जण पसार झाले. वाघळे यास पाच दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली, तर देवकर आणि पंडित यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस उपअधीक्षक अजित टिके या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चौकट
दीड महिन्यापूर्वीच आटपाडीला नेमणूक
वेश्या अड्ड्यावर सापडलेला निरीक्षक देवकर यापूर्वी मुंबईत कार्यरत होता. दीडच महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्याची आटपाडी पोलीस ठाण्याचा निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
चौकट
शिस्तभंगाची कारवाई
वेश्या अड्ड्यावर पोलीस निरीक्षक सापडल्याने अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. देवकरवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.