आटपाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदाेलन हातघाईवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST2021-07-11T04:19:36+5:302021-07-11T04:19:36+5:30

सोमवारपासून आटपाडी ग्रामपंचायतीच्या ४५ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जागोजागी कचऱ्याचे ...

Atpadi Gram Panchayat employees on strike | आटपाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदाेलन हातघाईवर

आटपाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदाेलन हातघाईवर

सोमवारपासून आटपाडी ग्रामपंचायतीच्या ४५ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. आधीच गावाला पाच दिवसांतून पाणी मिळत हाेते. पण, कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे अनेक भागात दहा दिवस झाले, पाणी आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीन बैठका घेऊनही यावर तोडगा निघत नसल्याने कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यासही कर्मचाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे शेवटी ग्रामपंचायतीने पर्यायी यंत्रणा उभी करून गावातील पाणीपुरवठा सुरू केला. काही भागात पाणी पोहोचलेही. दरम्यान, कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली. २५ ते ३० कर्मचारी थेट आटपाडी तलावावर पोहोचले. त्यांनी पाणीयाेजनेच्या मोटारी बंद केल्या. जलशुद्धीकरण केंद्रावरील नवीन कर्मचाऱ्यांना दमदाटी देऊन त्यांच्याकडून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक साधने घेऊन पाणी बंद केले.

यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर आले. याची माहिती मिळताच सहायक निरीक्षक अजित पाटील फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांना ‘आंदोलन करा, पण गावाला वेठीस धरता येणार नाही. अन्यथा, कारवाई करू’ असा इशारा दिला. त्यानंतर कर्मचारी तिथून निघून गेले.

दरम्यान, सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच अंकुश कोळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तातडीने जलशुद्धीकरण केंद्राजवळ पोहोचले. रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, गावात मुख्य पाण्याच्या टाकीपासून पाणी सुरू करण्यासाठी आवश्यक साधने आंदोलक कर्मचाऱ्यांनी पळवून नेल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. रात्री उशिरापर्यंत सरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी जलशुद्धीकरण केंद्रासमाेर ठाण मांडले हाेते.

फोटो : १० आटपाडी ३

ओळी : आटपाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच अंकुश कोळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी ठाण मांडले हाेते.

Web Title: Atpadi Gram Panchayat employees on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.