आटपाडीत एका दगडात अनेक पक्षी घायाळ

By Admin | Updated: August 11, 2014 23:32 IST2014-08-11T23:20:11+5:302014-08-11T23:32:31+5:30

विधानसभा निवडणुकीचे वेध : तिरंगी लढतीत बंडखोरीच्या घोषणेने रंगत; मतदारसंघात चर्चा

Atpad in a stone, many birds wounded | आटपाडीत एका दगडात अनेक पक्षी घायाळ

आटपाडीत एका दगडात अनेक पक्षी घायाळ

अविनाश बाड --आटपाडी -- आटपाडीत नुकत्याच झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून यावेळी बंडखोरीची घोषणा केली. गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी आमदार अनिल बाबर यांच्यावर केलेल्या जोरदार टीकेचा सध्या वेगवेगळा अर्थ लावला जात आहे. त्यामुळे देशमुख यांनी एका दगडात अनेक पक्षी घायाळ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शनिवारी येथे खरे तर कृष्णा नदीतून आटपाडी तालुक्याच्या ५३ गावांच्या पाणी योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, पण हा कार्यक्रम योजनेऐवजी विधानसभेच्या निवडणुकीवरच जास्त रंगला. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमोर अमरसिंह देशमुख यांनी, आबा, तुम्ही आम्हाला तिकीट देणार नाही हे माहीत आहे, पण आता आम्ही थांबणार नाही. निवडणूक लढविणारच, असे जाहीर करून, राष्ट्रवादीच्या नेत्यांचेही यावेळी ऐकणार नसल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही देशमुख यांची भेट झाल्याचे वृत्त आहे.
गृहमंत्री पाटील यांनीही, माझ्यामुळे मागील दोन विधानसभेच्या निवडणुका आटपाडीकरांना थांबावे लागल्याचे मान्य केले. पाटील आणि माजी आमदार अनिल बाबर यांचे बंधुप्रेम सर्वज्ञात आहे. त्यामुळेच आबांनी बाबर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर केलेली टीका बाबर गटाला झोंबणारी ठरली आहे.
विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याऐवजी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना मदत केल्याचा आरोप आबांनी केल्यानंतर आबांची लोकसभेची जखम अजून ताजी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विसापूर गटातून आबांची मदत कोणाला मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आटपाडी आणि विट्यातील तीन प्रस्थापित नेते प्रथमच एकमेकांसमोर शड्डू ठोकणार आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकीत आटपाडीतून राजेंद्रअण्णा देशमुख, विट्यातून सदाशिवराव पाटील आणि बाबर या तिघांनी प्रत्येकवेळी दोघे एका बाजूला आणि एकजण दुसऱ्या बाजूला अशाच पध्दतीने विधानसभा निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे या नेत्यांना कोण किती पाण्यात आहे हे प्रथमच कळणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत, पण राष्ट्रवादीचे किती गट कुठल्या नेत्याला पाठिंबा देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Atpad in a stone, many birds wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.