वातावरण ढगाळ, द्राक्षोत्पादक घायाळ
By Admin | Updated: September 18, 2014 23:27 IST2014-09-18T23:03:48+5:302014-09-18T23:27:33+5:30
मिरज पूर्वमधील चित्र : रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता

वातावरण ढगाळ, द्राक्षोत्पादक घायाळ
प्रवीण जगताप - लिंगनूर -मिरज पूर्व भागास पुन्हा एकदा ढगाळ हवामानाने घेरले आहे. बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून ढगाळ वातावरण होण्यास प्रारंभ झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे सर्वच द्राक्षबागांना फटका बसू लागला आहे. आज दिवसभरात अनेक गावांत तुरळक पावसाच्या सरी पडू लागल्या आहेत. त्यामुळे ‘वातावरण ढगाळ आणि द्राक्षोत्पादक घायाळ’ असे चित्र निर्माण झाले आहे.
मागील आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा काल रात्री बारापासून वातावरणात अचानक मोठा बदल झाला आहे. आज (गुरुवारी) सकाळी लिंगनूर, संतोषवाडी, जानराववाडी यासह पूर्व भागातील अनेक गावांत सकाळी नऊच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी पडल्या. हा पाऊस अन्य पिकांना फारसा परिणामकारक नसला तरी, द्राक्षोत्पादक मात्र घायाळ झाले आहेत.
याबाबत काही द्राक्षोत्पादकांशी सांगितले की, मागील आठवड्यापूर्वी पावसाने संततधार लावली होती. त्यामुळेही काही द्राक्षबागांना दावण्याचा झटका बसला होता, तर पूर्व भागात आॅगस्ट छाटणी घेणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या या आॅगस्ट छाटणीच्या बागात द्राक्षघडांची निर्मिती झाली आहे, तर काही द्राक्षबागा फ्लॉवरिंग व पोंगा स्टेजमध्ये आहेत. या सर्वच स्टेजमधील बागांना दावण्या, करपा, भुरी यासारख्या रोगांचा फटका बसू लागला आहे. त्यामुळेच बागांवर महागड्या औषध फवारणीचा सपाटा सुरू झाला आहे. घडांवर व डोळ्याच्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे.
काही द्राक्षोत्पादकांनी आजचाच मुहूर्त छाटणीसाठी निवडला होता. मात्र या पावसाने व ढगाळ वातावरणामुळे त्यांनी छाटण्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींनी छाटणीवेळी काड्यांना लावलेली पेस्ट या पावसाने धुऊन त्याचा फुटण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले.
काही द्राक्षोत्पादकांनी बेदाणा निर्मितीसाठी असलेल्या बागांची आॅक्टोबर छाटणी घेण्याचे ठरविले आहे. त्या द्राक्षबागांनाही या पावसाची तीव्रता वाढल्यास छाटणी न झालेल्या काडीवरचे डोळे छाटणी न करताच फुटण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो. असे छाटणीआधी फुटलेले व औषधाअभावी वाढणारे घड रोगांना बळी पडतात, त्यांचे उत्पन्न येऊ शकत नाही. त्यामुळे सर्वच स्टेजमधील द्राक्षोत्पादकांना ढगाळ हवामानाने चिंताक्रांत करून सोडले आहे.
नजरा इंटरनेटवर खिळल्या...
बुधवारी रात्रीपासून बदललेले ढगाळ हवामान आणखी किती दिवस आहे. पावसाचे प्रमाण कसे आहे, याचा इंटरनेटवरील हवामान अंदाजाच्या साईट्सवरून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार औषधांचे नियोजन व निवड करून आपापल्या बागा वाचविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.