आश्वासक नेतृत्व : निशिकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST2021-07-12T04:17:16+5:302021-07-12T04:17:16+5:30
उरुण : इस्लामपूर शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय मानून सार्वजनिक जीवनात आश्वासक नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, ...

आश्वासक नेतृत्व : निशिकांतदादा पाटील
उरुण : इस्लामपूर शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय मानून सार्वजनिक जीवनात आश्वासक नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचा आज वाढदिवस. मानाजी भोसले-पाटील घराण्यातून मिळालेला राजकारणाचा वारसा तर सामान्य कामगारांच्या मनात आणि त्यांच्या आयुष्यात आईची माया देणाऱ्या कै. प्रकाश पाटील (तात्या) यांच्याकडून मिळालेला कामगार चळवळीतील सेवेचा वसा हीच निशिकांत पाटील (दादा) यांच्या यशाची शिदोरी आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निशिकांतदादा यांच्याकडे विद्यार्थी दशेपासूनच नेतृत्वाची चुणूक होती. त्यांच्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या भोवती नेहमीच मित्रांचा गराडा असायचा. लहानपणापासूनच प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाण्याचा त्यांना मदत करण्याचा मोठा सद्गुण निशिकांतदादांमध्ये ठायी ठायी भरलेला आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबांची जबाबदारी स्वीकारत त्यांनी विद्युत मंडळात लिपिक म्हणून आणि कामगारांचे नेते म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे वडील प्रकाश तात्यांनी ज्या पद्धतीने वीज मंडळातील सर्व कामगारांना आपल्या कुटुंबातील घटक मानून आधार दिला. त्याच पद्धतीने निशिकांतदादांनी आपल्या वडिलांचा कित्ता गिरवत सर्वच कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनावर गारुड केले.
स्वत:ची नोकरी सांभाळत असतानाच निशिकांतदादांच्या डोक्यात समाजासाठी काहीतरी चांगले करायचे ही तळमळ रुंजी घालत होती. त्यातूनच मग सवंगड्यांच्या साथीने २००२ साली शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि पदव्युत्तर शिक्षणाची इस्लामपूर शहरातील पहिली शाखा सुरू करण्याचा बहुमान निशिकांत पाटील यांनी प्रकाश शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून पटकावला.
वैद्यकीय क्षेत्रातील या यशदायी आगमनानंतर निशिकांत पाटील यांनी मागे वळून न पाहता आपला दूूरदृष्टीतील नावीन्यपूर्ण आणि अभिनव योजना कृतीत उतरायला सुरुवात केली. परिसरातील लहान मुलांना सुरुवातीपासूनच उच्च दर्जाच्या इंग्रजी शिक्षणाची सुविधा मिळावी. यासाठी त्यांनी प्रकाश पब्लिक स्कूल या सीबीएसई दिल्ली पॅटर्नच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘न भुतो न भविष्यती’ असे यश प्रत्येक वर्षी मिळवत या स्कूलचे नाव देशभरात गाजविले. त्यानंतर प्रकाश मराठी माध्यमाची दर्जेदार शाळा ही या संकुलात सुरू करण्यात आली.
संस्थात्मक कामाचा हा व्याप निशिकांतदादा पाटील यांनी उत्तरोत्तर वाढविताना त्याला दर्जेदार गुणवत्तेची जोड दिली. शिस्तप्रियता, नावीन्यता जपताना गुणवत्तेशी तडजोड न करण्याचा त्यांचा स्वभाव हा प्रकाश शैक्षणिक संकुलाच्या यशाची सोनेरी किनार बनून राहिला आहे. नर्सिंग महाविद्यालय आणि प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅॅन्ड रिसर्च सेंटर या एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली. या एमबीबीएस महाविद्यालयाच्या स्थापनेने त्यांच्या संस्थात्मक कार्याच्या कामावर अनेकांना निशिकांतदादांचा अभिमान वाटू लागला.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातून समाजकारणाची वाट चालणाऱ्या निशिकांतदादांसमोर नियतीनेच राजकीय सारीपाटावरील विजयपथाच्या मार्गावरील अनपेक्षितपणे आणून सोडले. २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतून त्यांची दमदार राजकीय वाटचाल सुरू झाली. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इथल्या तब्बल ३० वर्षांच्या एककल्ली राजवटीचा पराभव करत निशिकांतदादा पाटील यांनी आपल्या नेतृत्वाकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. शहराची राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक अशी प्रचंड माहिती असणारा हा युवा नेता सर्व शहरवासीयांच्या गळ्यातील ताईत बनून गेला.
नगरपालिकेतील सूत्रे स्वीकारल्यानंतर संपूर्ण शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन निशिकांतदादांनी आपल्या कामाला सुरुवात केली. आपल्या दालनात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची अडचण जाग्यावरच सोडविण्याचा त्यांनी धडाका लावला. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आणि कार्यकर्त्याची आपुलकीने चौकशी करून दादांनी नेहमीच प्रत्येकाला मदतीचा हात दिला. शहराच्या विकासाच्या नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी कृतिशील पावले उचलायला सुरुवात केली. शहराच्या पुढील ५० वर्षांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या भुयारी गटार योजनेच्या आव्हानात्मक कामाची सुरुवात त्यांनी केली. शहराच्या विकासाचे एखादे मोठे काम होत असताना त्यातून काही अडीअडचणी निर्माण होत असतात. नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्रास होत असतो. नागरिकांच्या या त्रासाला काहींनी राजकारणाची किनार लावत टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र या टीकाकारांनाही विधायक पद्धतीने कामाच्या माध्यमातून उत्तरे देत निशिकांतदादांनी समाजाच्या हिताचा आणि विकासाचा वसा कायम ठेवला.
वाळवा तालुक्यात तीन वर्षांपूूर्वी उद्भवलेल्या महापुराच्या संकटकाळात निशिकांतदादांनी वाळवा तालुक्यासह मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत मदतीचा अखंड ओघ सुरू ठेवला होता. गंभीर संकटात सापडलेल्या गावांमध्ये कमरे एवढ्या पाण्यातून घराघरांपर्यंत पोहोचत त्यांनी नागरिकांना मानसिक आधार आणि धैर्य देण्याचे काम केले होते. कोरोनाच्या महामारीच्या पहिल्या लाटेत तर निशिकांतदादांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाविरुद्ध लढा देण्याला सुरुवात केली होती. आपले कार्यकर्ते आणि पालिकेतील प्रशासकीय यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी अशा सगळ्यांना सोबत घेऊन शहरामध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले होते.
नगरपालिकेच्या सभागृहातील शहराच्या विकासावर होणाऱ्या विचारमंथनात तर निशिकांतदादांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि विकासाच्या दूरदृष्टीची छाप नेहमीच सोडली आहे. नगरपालिका अधिनियमांचा त्यांचा अभ्यास हा प्रत्येकालाच थक्क करून सोडतो. पालिका अधिनियमांचा गाढा अभ्यास असणारे आणि शहराला लाभलेले निशिकांतदादा हे पहिलेच नगराध्यक्ष ठरले आहेत.
प्राजंली अर्बन निधी बॅँकेच्या स्थापनेतून त्यांनी अर्थकारणाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. भाजपचे पक्षसंघटन वाढविताना त्यांनी समाजातील सर्व घटनांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या संघटनात्मक कामाचे कौतुक पक्षाचे वरिष्ठ नेते नेहमीच करत असतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी सहकार मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निशिकांतदादा पाटील यांची भाजपमधील वाटचाल सुरू आहे.
भविष्यामध्ये इथेनॉल प्रकल्प, दूध संघ, महिलांसाठी उद्योग, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण आणि दर्जेदार आरोग्य व शिक्षण व्यवस्था उभारण्याचा निशिकांतदादा पाटील यांचा मनोदय आहे. अलीकडच्या काळात तत्त्वहीन आणि द्वेषमुलुक राजकारण हे करिअर होऊ शकते का? असे वाटायला लावणारी परिस्थिती आहे. मात्र या तत्त्वहीन आणि द्वेषमुलुक राजकारणाला पुरून उरत निशिकांतदादांनी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन पुढे जात आहेत. समाजबांधणी कशी करावी, पक्ष कार्यकर्त्यांची काळजी कशी घ्यावी. त्यांचा गाडा कसा हाकावा यासाठी नेहमीच विचारशील असणारे निशिकांतदादांचे हे आश्वासक नेतृत्व यशाच्या वाटेवर उत्तरोत्तर बहरत जावो, याच त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा.
-युनुस शेख, इस्लामपूर