तैलचित्रांची विक्री करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:20+5:302021-01-13T05:10:20+5:30

आरग (ता. मिरज) येथील आदमअली सुलतान मुजावर हे कळंबी (ता. मिरज) येथील अजितराव घोरपडे विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत ...

Assistance to CM Assistance Fund by selling oil paintings | तैलचित्रांची विक्री करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत

तैलचित्रांची विक्री करून मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत

आरग (ता. मिरज) येथील आदमअली सुलतान मुजावर हे कळंबी (ता. मिरज) येथील अजितराव घोरपडे विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत रांगोळीच्या माध्यमातून जगातील २३ वर्ल्ड रेकॉर्ड बुकात त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. कलेच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड बुकात नाव नोंदवणारे ते पहिले भारतीय आहेत. त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. कोरोना साथीमुळे गेल्या नऊ महिन्यांत शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाची वर्गशिक्षकाची जवाबदारी पूर्ण वेळेचा चांगला सदुपयोग व्हावा; म्हणून त्यांनी कॅन्व्हास पेंटिंग करण्यास सुरुवात केली. व्यक्तिचित्रे रेखाटली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बसवेश्वर, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती संभाजीराजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, कर्मवीर या थोर व्यक्तींची तैलचित्रे रेखाटली. संकटाच्या काळात आपलाही देशकार्यात हातभार लागावा, या हेतूने त्यांनी तैलचित्र विक्रीतून मिळणारी रक्कम शासनाला देणगी देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील कलारसिकांनीही त्यास दाद दिली. मुजावर यांनी सर्व चित्रांचे घरातील छोटेखानी आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवले.

निम्म्या किमतीत पेंटिंग विक्री व मिळणारी रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले. अनेकांनी ही चित्रे स्वागतमूल्य देऊन विकत घेतली. मुजावर यांनी सात ते आठ महिने दिवस व रात्र मेहनत घेऊन सुमारे पंचवीस तैलचित्रे रेखाटली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे चित्र वीस ते बावीस दिवस मेहनत घेऊन त्यांनी पूर्ण केले. उद्योजक सी. आर. सांगलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र पन्नास हजारांना विकत घेतले. अनेकांनी स्वागतमूल्य देऊन चित्रे विकत घेतली. सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्तींनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कोरोनाकाळातील माझा वेळ सत्कारणी लागला व एक शिक्षक व देशाचा नागरिक म्हणून महाराष्ट्रासाठी काहीतरी करू शकलो, याचा अभिमान व आनंद असल्याचे मुजावर यांनी सांगितले.

Web Title: Assistance to CM Assistance Fund by selling oil paintings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.