विधानसभेसाठी मिरजेतील इच्छुकांची पतंगरावांकडे धाव
By Admin | Updated: June 24, 2014 01:21 IST2014-06-24T00:47:40+5:302014-06-24T01:21:01+5:30
निष्ठेचे दाखले : स्थानिक उमेदवारांची मागणी

विधानसभेसाठी मिरजेतील इच्छुकांची पतंगरावांकडे धाव
मिरज : मिरजेतील इच्छुक उमेदवारांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पतंगराव कदम यांची निवासस्थानी भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्थानिक उमेदवारच द्यावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळात बाळासाहेब होनमोरे, सिध्दार्थ जाधव, दयाधन सोनवणे, सदाशिव खाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश कांबळे यांचा समावेश होता. मिरज विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारच द्या, काँग्रेस पक्षाचे आम्ही दहा ते पंधरा वर्षे सक्रिय कार्यकर्ते आहोत. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात व ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, लोकसभा अशा सर्व निवडणुकांत पक्षाचे काम केले आहे, असे सांगत शिष्टमंडळाने साकडे घातले.
फक्त आमदारकीवर डोळा ठेवून मिरजेशी व काँगे्रस पक्षाशी काहीही संबंध नसणारे उमेदवार राखीव मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षाकडे प्रयत्न करीत आहेत; मात्र पक्षाने मिरजेबाहेरील उमेदवार दिल्यास सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षावरचा विश्वास उडणार आहे. मिरज विधानसभेसाठी पक्षाची उमेदवारी आम्हा स्थानिकांपैकीच कोणालाही द्या, आम्ही पक्षाच्या उमेदवारास निवडून आणू, अशी हमी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना दिली.
मिरज विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत बाहेरच्या उमेदवाराचा विचार केला जाणार नाही. स्थानिक उमेदवारालाच संधी मिळेल, बाहेरचा उमेदवार देऊन काँग्रेसची वाताहत होणार नाही, याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने मी स्वत: घेणार असल्याचे आश्वासन डॉ. कदम यांनी शिष्टमंडळास दिले. स्थानिकांचे शिष्टमंडळ माजी मंत्री मदन पाटील व प्रतीक पाटील यांनाही भेटणार असल्याचे सिध्दार्थ जाधव यांनी सांगितले. स्थानिक उमेदवाराच्या मुद्याबाबत पक्षीय स्तरावर काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)