‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ची सांगता
By Admin | Updated: June 13, 2016 00:10 IST2016-06-12T22:54:03+5:302016-06-13T00:10:25+5:30
उत्स्फूर्त प्रतिसाद : पालक, विद्यार्थ्यांत समाधान; दहावीतील गुणवंतांना ‘लोकमत’ची शाबासकी

‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ची सांगता
सांगली : करिअरविषयक प्रश्नांबाबत अचूक उत्तर देणाऱ्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ची रविवारी विद्यार्थी, पालकांच्या गर्दीत व उत्साहात सांगता झाली. प्रदर्शनातून मिळालेल्या माहितीबद्दल पालक, विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. जिद्द, अभ्यासातील सातत्याच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या गुणवंतांचा खा. संजय पाटील व आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते यावेळी सत्कार करून ‘लोकमत’ने त्यांना शाबासकी दिली.
येथील राम मंदिर चौक परिसरातील कच्छी जैन भवनात शुक्रवारपासून सुरू असलेल्या या आगळ्यावेगळ्या आणि विद्यार्थी, पालकांतील करिअरविषयक दिशा स्पष्ट करणाऱ्या प्रदर्शनाचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने शहरासह जिल्हाभरातून विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती. शिक्षण आणि करिअरबाबत एकाच छताखाली माहिती मिळविण्याची शेवटची संधी असल्याने आज सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थी, पालक प्रदर्शनात येऊ लागले. येथील प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरचा कल लक्षात घेऊन आपल्या संस्थेमधील विविध अभ्यासक्रम, त्यांच्या कालावधीसह शुल्काची सविस्तर माहिती देण्यात येत होती. प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत विद्यार्थी, पालकांची गर्दी कायम राहिली.
प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा खा. संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात सत्कार झाला.
यावेळी बोलताना खा. संजय पाटील म्हणाले की, आजकाल यश मिळविण्यासाठी केवळ गुण आवश्यक नसतात, तर पुढील करिअरसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ‘लोकमत’ने अशा उपक्रमातून विद्यार्थी व पालकांना एक दिशा निर्माण करून दिली आहे. करिअर घडविताना आपल्या विचारांपेक्षा आपल्या आई-वडिलांच्या विचारांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण आई-वडीलच मुलांच्या आयुष्याबाबत योग्य निर्णय घेत असतात.
सध्या चांगल्या दर्जाच्या संस्था आपल्या भागातही कार्यरत असून, पालकांनी योग्य निर्णय घेऊन मुलांसाठी प्रवेश घ्यावा. स्पर्धात्मक परीक्षांसाठी जिल्ह्यात चांगले वातावरण असून युपीएससी परीक्षेसाठी एक दर्जेदार मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. सुधीर गाडगीळ म्हणाले की, आपल्या मुलांनी आयुष्यात काय करावे, यासाठी पालकांनी अजिबात अट्टाहास करता कामा नये. मुलांना त्यांचे करिअर निवडताना पूर्ण मुभा देणे आवश्यक आहे. त्यांच्या आवडीनुसार जर करिअर निवडले गेले, तर मुले यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते. मुलांनी आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचा ठोस निर्णय घ्यावा. हा निर्णयच त्यांचे करिअर घडवितो. सांगलीत दर्जेदार युपीएससी मार्गदर्शन केंद्राची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रदर्शनानिमित्त आयोजित विविध सत्रांमध्ये रविवारी ‘इंजिनिअरिंगमधील करिअर’ या विषयावर प्रा. निखिल पारसनीस यांनी, तर ‘पदवी करत युपीएससी, एमपीएससीची तयारी कशी करावी?’ या विषयावर युनिक अॅकॅडमीचे शशिकांत बोरालकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाबरोबरच सायन्स पंडित व पिओ बॅँक प्रोबेशनरी आॅफिसर स्पर्धेचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)