सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:45+5:302021-05-31T04:19:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : खांद्यावर सिलिंडरचे ओझे घेऊन घरोघरी जाणाऱ्या डिलिव्हरी बाॅयच्या कोरोना लसीकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ...

सिलिंडर देणाऱ्यास विचारा, लस घेतली का?
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खांद्यावर सिलिंडरचे ओझे घेऊन घरोघरी जाणाऱ्या डिलिव्हरी बाॅयच्या कोरोना लसीकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. घरातील स्वयंपाकघरापर्यंत जावून काही कर्मचारी सिलिंडर जोडत असतात. त्यांना आजअखेर फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे केवळ ३० टक्के कर्मचाऱ्यांनी जमेल तशी लस घेतली आहे.
शासनाने फ्रंटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे निर्देश दिले आहेत. पण या फ्रंटलाईन वर्कर्सना लसच मिळत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यात सिलिंडर घरपोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हे कर्मचारी ग्राहकांच्या घरापर्यंत जातात. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो. सिलिंडरचे ओझे वाहणारा हा कर्मचारी साधारणत: २० ते ४० या वयोगटातील आहे. त्यात ४५ वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण बंदच आहे. त्यामुळे या डिलिव्हरी बाॅयना लसच मिळालेली नाही. ४५पेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांचे बऱ्यापैकी लसीकरण झाले आहे. पण त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून प्रशासनाने कोणतीही सोय केलेली नाही. गॅस एजन्सी संघटनेकडून प्रशासनाला लेखी विनंतीही करण्यात आली होती. पण त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शहरातील ७० टक्के डिलिव्हरी बाॅय लसीकरणापासून वंचित आहेत.
चौकट
सिलिंडर सॅनिटाईज केले का?
घरात गॅस सिलिंडर आल्यानंतर तो सॅनिटाईज करण्याची गरज आहे. गॅस कंपन्याकडून मात्र सिलिंडरचे सॅनिटायझेशन केले जात नसल्याचे सांगण्यात आले. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. त्यामुळे धोका अधिक असल्याचा कंपन्यांचा दावा आहे.
चौकट
५ ते ६ डिलिव्हरी बाॅय पाॅझिटिव्ह
शहरात जवळपास १५० डिलिव्हरी बाॅय आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत पाच ते सहाजणांना कोरोनाचा बाधा झाली आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. गॅस एजन्सीकडून कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनेही पुरविण्यात आली आहेत. मास्क, सॅनिटायझेशनबाबत वारंवार सूचना दिल्याने पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण कमी आहे.
चौकट
कोट
आम्ही आवश्यक ती खबरदारी घेऊन गॅस घरपोच करतो. अनेकदा घरात पुरूष मंडळी नसली तर स्वयंपाकघरापर्यंत जावून गॅस ठेवावा लागतो. एखाद्याच्या घरात पाॅझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती नसते. त्यामुळे आम्हाला लसीची गरज आहे. - आदिनाथ मालगावे
कोट
लसीकरणासाठी अनेकदा केंद्रावर गेलो, पण लस मिळाली नाही. जीवाची पर्वा न करता आम्ही गॅसचा पुरवठा करत आहोत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून डिलिव्हरी बाॅयसाठी विशेष लसीकरण हाती घ्यावे. - प्रवीण कांबळे
चौकट
जबाबदारी कोणाची?
सिलिंडरची सेवा अत्यावश्यक बाब आहे. त्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना घरापर्यंत जावे लागते. संघटनेच्यावतीने शासन स्तरापासून जिल्हा पातळीपर्यंत लेखी निवेदन देऊन लसीकरणाची मागणी केली आहे. पण आजअखेर प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. जोखीम पत्करून काम करणाऱ्या या वर्गाच्या लसीकरणाबाबत गांभीर्याने विचार व्हावा. - अभयकुमार बरगाले, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन.
चौकट
अशी आहे आकडेवारी
शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहक : १,५०,०००
गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सी : ९
घरपोच डिलिव्हरीसाठी असलेले कर्मचारी : १५०
किती कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला : ५२
किती कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस : २४
एकही डोस न घेणारे कर्मचारी : ९८